
तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात बुधवारी (दि.१०) पहाटे अज्ञात सात जणांच्या सशस्त्र टोळीने दोन कुटुंबांवर हल्ला करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी घरात घुसून कुटुंबियांना मारहाण केली तसेच चाकूचा धाक दाखवत दागिने व रोख रक्कम लंपास केली. दरम्यान,जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना पुढील तपासाच्या सूचना दिल्या. कीर्तनवाडी येथील शेतकरी रावसाहेब बाजीराव कीर्तने (वय ५३) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रात्री कुटुंबीय झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कुलूप तोडून सात जणांची टोळी घरात शिरली. त्यापैकी एक जण बाहेर थांबला होता. घरात घुसलेल्या आरोपींनी कपाटांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम शोधण्यास सुरुवात केली. कीर्तने यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी लोखंडी गज व धारदार हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. तसेच कुटुंबियांना मारहाण करत कपाटातील दागिने हिसकावून घेतले. जीवे मारण्याची धमकी देत घरातील सर्व मौल्यवान वस्तूंची माहिती विचारण्यात आली. दरम्यान, सागर कीर्तने यांनी एका खोलीतून नातेवाईकांना दूरध्वनीवरून माहिती दिली. गावातील नागरिक घटनास्थळी येत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळ काढला. या दरोड्यात कीर्तने कुटुंबाचे सुमारे ३ लाख ७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास झाली. याच टोळीने काही वेळानंतर कीर्तनवाडीपासून सुमारे ८०० मीटर अंतरावर असलेल्या बाबासाहेब दशरथ बटुळे यांच्या घरावरही दरोडा टाकला. आरोपींनी बाबासाहेब बटुळे व त्यांच्या पत्नीला मारहाण करून सुमारे १ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ४० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. भागवत बाबुराव बटुळे व शांताराम बप्पा बटुळे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या असून पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संयुक्तरीत्या तपास करत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
