
कोंढवा पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ११ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मोबाइल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमर सलीम शेख (वय २१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल २०२६ रोजी कोंढवा परिसरातून एका नागरिकाचा मोबाइल फोन चोरीला गेला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, तपास पथकाला बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शिवनेरीनगर परिसरातील एक तरुण चोरीचे मोबाइल विक्रीसाठी ग्राहक शोधत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून उमर शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे चोरीचा मोबाइल आढळून आला. अधिक चौकशीत त्याने विविध ठिकाणांहून मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक रविंद्र गावडे यांच्या पथकाने केली. गांजा विक्रीसाठी आलेला तरुण गजाआड शिवाजीनगर रेल्वे परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल साडेचार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. राहुल सदाशिव कांबळे (वय २८, रा. शेलारवाडी स्टेशन, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस नाईक सचिन जाधव आणि पोलिस अंमलदार श्रीकांत मखरे यांना शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील झाडाझुडपांच्या परिसरात एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने सापळा रचला आणि राहुल कांबळे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताची झडती घेतली असता, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. चौकशीत राहुल कांबळेने हा गांजा हैदर इराणी याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
