
बदलापूर आणि सांगलीत घडलेल्या हत्याकांडाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. बदलापूरमधील जुवेलीगाव परिसरात मनीषा भोसले या महिलेसह ओला चालक ज्योतिबा शिंदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे, सांगलीमध्ये एका हमाल नेत्याच्या घरात घुसून त्यांच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाची गोळ्या झाडून निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापूर पूर्वेकडील जुवेली गाव परिसरात मनिषा भोसले नावाच्या महिलेसह ओला चालक ज्योतिबा शिंदे यांची धारदार शस्त्राने हत्या झाल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. हे दोघेही ओला कारने बदलापुरात आले होते. या घटनेत मनिषा यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने ‘आईला ओला चालकाने मारले’, असा धक्कादायक जबाब पोलिसांना दिला आहे. मात्र, महिलेची हत्या करणाऱ्या ओला चालकाची (ज्योतिबा शिंदे) हत्या नेमकी कोणी केली, हे अद्याप गूढ असून या दुहेरी हत्याकांडाचा कसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. सध्या फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नेत्याच्या 13 वर्षीय नातवाची गोळ्या झाडून हत्या सांगलीतील संजयनगर परिसरातील एसटी कॉलनीत चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून एका हमाल नेत्याच्या 13 वर्षीय नातवाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वेदांत मारुती बंडगर (वय 13) असे या मृत मुलाचे नाव असून, या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण सांगली शहर हादरून गेले आहे. माथाडी कामगारांच्या वादातून हा जीवघेणा गोळीबार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला असून, या भयंकर हत्याकांडाचा कसून तपास सुरू आहे. बदलापूरच्या भर सोसायटीत घुसून कोयता गँगची दहशत दरम्यान, बदलापूरमध्ये कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळाली असून, एका भरवस्तीतील निवासी सोसायटीत हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या संशयितांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. चोरी किंवा एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे संशयित सोसायटीच्या परिसरात फिरताना आढळले. त्यांच्या या संशयास्पद आणि धोकादायक हालचालींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बदलापूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूर शहरात यापूर्वीही कोयता गँगच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र तरीही अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त आणि त्यांच्या प्रतिबंधात्मक कारवायांवर आता तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी तातडीने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी भयभीत झालेल्या नागरिकांकडून केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
