
राज्यात मान्सूनपूर्व घडामोडींमुळे 13 जून रोजी हवामानाचा दुहेरी प्रभाव पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या काही भागात विशेषतः मराठवाड्यात उष्णतेची लाट असणार आहे, तर काही भागांत पावसाची हजेरी असणार आहे. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास, 6 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट, 10 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, विदर्भातील 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि 2 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी देखील बहुतांश भागांमध्ये उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागणार आहेत. कोकणात उष्णतेची लाट कोकणातील बहुतांश भागांत उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट दिला असून, येथे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी कडक उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याउलट, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मात्र पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून तिथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात संमिश्र हवामान उत्तर महाराष्ट्रातील हवामान तुलनेने संमिश्र राहणार आहे. नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून कोणताही अधिकृत इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, या जिल्ह्यांमधील काही भागांत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि नागरिकांनी स्थानिक हवामानाच्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवूनच आपली कामे मार्गी लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण तयार झाले आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून येथे जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कोणताही विशिष्ट अलर्ट नसला तरी, ढगाळ हवामानासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच, या भागांत वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. विदर्भाची परिस्थिती कशी असणार? राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत विदर्भात मात्र हवामानाचा सर्वाधिक लहरीपणा आणि तीव्र उन्हाळा पाहायला मिळत आहे. या भागात उन्हाचा तडाखा कायम असून अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
