
प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी व सरपंचांच्या मागणीनुसार ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, विमानतळासाठी आवश्यक असलेल्या १ हजार २१६ हेक्टर क्षेत्रापैकी ८५१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून सुमारे ७० टक्के करारनामे जमा झाले आहेत. त्यासाठी आता पर्यंत ९५० रुपयांचे वाटप झाले असून २००० कोटी रुपये पुढच्या आठवड्यात प्राप्त होतील. उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन संपादन करताना काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे मूल्यांकन, न्यायालयीन दावे, महसूल विभागातील प्रकरणे, नाव दुरुस्ती, वारस नोंदी, हक्कसोडपत्र आणि इतर महसुली प्रक्रिया प्रलंबित आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी त्यास काहीसा कालावधी लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. संबंधित सर्व बाबींचा विचार करून जमीन अधिग्रहणास सहमती व मोबदला स्वीकारण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे डुडी यांनी स्पष्ट केले. या मुदतवाढीमुळे प्रलंबित कागदपत्रे आणि महसुली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार असून उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
