
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रायगडावरील वाघ्या श्वानाचे शिल्प हटवण्यास कडाडून विरोध केला आहे. रायगडावरील वाघ्याचे शिल्प आम्ही हटवू देणार नाही. गरज भासल्यास आम्ही या प्रकरणी कोर्टात दाद मागू, असे त्यांनी म्हटले आहे.
.
स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी रायगडवरील वाघ्या श्वानाच्या समाधीचा प्रश्न उपस्थित केला होता. ही समाधी कपोलकल्पित असून, तिला इतिहााचा कोणताही आधार नाही, असे ते म्हणाले होते. त्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही वाघ्याचा शिवाजी महाराजांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. यामुळे यासंबंधी नवा वाद उत्पन्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका विषद केला आहे.
31 मे रोजीचाच अल्टीमेटम का?
लक्ष्मण हाके या प्रकरणी संभाजीराजेंवर निशाणा साधताना म्हणाले, संभाजीराजे यांनी वाघ्या श्वानाच्या स्मारकाप्रकरणी सरकारला 31 मे चा अल्टिमेटम दिला आहे. राज्यातील सर्वच ओबीसी बांधवांचा यावर आक्षेप आहे. त्यांनी 31 मे चीच तारीख का निवडली? त्या दिवशी मातोश्री अहिल्यादेवी यांची जयंती आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या गावी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या प्रयत्नांत अडथळा निर्माण करण्यासाठीच मुद्दाम ही तारीख ठरवली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संभाजीराजे छत्रपती यांची निवड रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी किल्ल्याचे संवर्धन करावे. पण ते हे आपले काम सोडून किल्ल्याची नासधूस करत आहेत. ते महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे धनगर समाज म्हणून आमचा त्यांना विरोध आहे.
संभाजीराजेंची प्राधिकरणावरून हकालपट्टी करा
लक्ष्मण हाके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा जिर्णोद्धार झाला त्यावेळी होळकरांनी मोठी मदत केली होती. त्यावेळी टिळक, फुले व होळकर यांनी वाघ्या शिल्पाविषयी कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्यांनी या समाधीची नासधूस केली नव्हती. पण आता रायगड विकास प्राधिकरणाच्या नावाने संभाजीराजे येथे नासधूस करत आहेत. यामुळे त्यांची प्राधिकरणावरून हकालपट्टी केली जावी.
आमचा या प्रकरणी संभाजीराजेंच्या भूमिकेला कडाडून विरोध आहे. आम्ही या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहू. या प्रकरणी गरज भासल्यास कोर्टातही दाद मागितली जाईल. पण रायगडावरील वाघ्या श्वानाचे शिल्प आम्ही हटवू देणार नाही, असे हाके यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा…
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा:संभाजीराजेंची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी; पण लेखक संजय सोनवणींचा विरोध, दंतकथा नसल्याचे पुरावेही दिले
मुंबई – रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, अशी मागणी युवराज संभाजीराजे छ्त्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संभाजीराजे यांनी एक पत्र लिहून आपली सविस्तर भूमिका विशद केलीय. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हे अतिक्रमण आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रध्देची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा असल्याचे म्हटले आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.