
Maharashtra
-Pritesh Suryawanshi
बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पवार कुटुंबातील अंतर्गत मतप्रवाह आता उघडपणे समोर येत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज मतदान होत असताना, संपूर्ण बारामतीकरांचे लक्ष सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांच्याकडे लागले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही निवडणुकांमध्ये एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणारे पवार कुटुंबीय या पोटनिवडणुकीत एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत असले, तरी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीवरून भविष्यातील संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
आमदार रोहित पवार यांनी २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या मते, आगामी विधानसभेत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी थेट लढत होऊ शकते. मात्र, युगेंद्र पवार यांनी रोहित पवारांचे हे विधान फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित पवार यांचे ते विधान वैयक्तिक असून, पुन्हा एकदा कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी आपली अजिबात इच्छा नसल्याचे युगेंद्र यांनी ठामपणे सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कौटुंबिक संघर्षामुळे जे काही घडले, त्याचे दुःख आजही मनाला चटका लावून जाते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, जय पवार यांनी देखील २०२९ च्या उमेदवारीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान राखत असले तरी, सध्या आपल्याला केवळ एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, रोहित पवार यांनी राजकीय गणिते मांडताना सुतोवाच केले की, जर सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार नसतील, तर जय पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार हेच प्रबळ उमेदवार असू शकतात.
जरी आजच्या पोटनिवडणुकीत बारामतीकरांच्या भावना ओळखून संपूर्ण पवार कुटुंबीय सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी एकत्र आले असले, तरी पक्षातील मतभेद आणि भविष्यातील राजकीय महत्त्वाकांक्षा पाहता बारामतीत पुन्हा एकदा काका-पुतण्यांमधील संघर्ष अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. एकूणच, सध्याची ही तात्पुरती ‘कौटुंबिक एकजूट’ २०२९ पर्यंत टिकणार का, हाच खरा कळीचा प्रश्न आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.







