
Maharashtra
-Pritesh Suryawanshi
येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे मोठी रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यातील एकूण १७ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा आणि मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या ९ सदस्यांच्या जागा अशा एकूण २६ जागांसाठी हालचालींना वेग आला आहे. यामध्ये ठाणे, पुणे, सोलापूरपासून ते थेट नागपूर आणि सिंधुदुर्गपर्यंतच्या मतदारसंघांचा समावेश असून, या निवडणुकांमुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांचा मार्ग मोकळा
गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लवकरच अहवाल पाठवला जाणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने या जागा भरण्यातील अडथळे दूर झाले आहेत. जरी २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप बाकी असल्या, तरी तांत्रिकदृष्ट्या या १७ जागांच्या निवडणुका घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, पुणे, नाशिक, नागपूर आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.
मे महिन्यात दिग्गज होणार निवृत्त
दुसरीकडे, विधानसभेच्या सदस्यांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या ९ विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. यामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, रणजितसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे राजेश राठोड या बड्या नेत्यांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेतील संख्याबळ आणि विजयाचे गणित
विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार, एका आमदाराला निवडून येण्यासाठी २८ मतांच्या कोट्याची आवश्यकता आहे. महायुतीकडे भाजप (१३१), शिवसेना शिंदे गट (५७) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (४०) यांच्यासह अपक्ष व लहान पक्षांचे मिळून एकूण २३४ आमदारांचे संख्याबळ आहे. या ताकदीच्या जोरावर महायुतीचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे केवळ ४९ मते असून, त्यांचा फक्त एकच उमेदवार आरामात विजयी होऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त १० मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
निवडणूक बिनविरोध की चुरशीची?
९ जागांच्या या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला ५, शिवसेनेला २, तर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जास्तीची १३ मते शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत जर महायुतीने आणखी एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला, तर ही निवडणूक बिनविरोध न होता अत्यंत चुरशीची ठरू शकते. त्यामुळे आगामी आठवड्यात जाहीर होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाकडे राज्याचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.







