
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, अखिल भारतीय छावा संघटनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
.
लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या समाप्तीनंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवेदन दिलं. यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे देखील उपस्थित होते. निवेदनादरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी निषेध म्हणून टेबलवर पत्तेही फेकण्यात आले.
या घटनेनंतर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण झाला आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले.
त्यांनी विधानपरिषदेत मोबाईलवर गेम खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी करत जोरदार निषेध नोंदवला. “सभागृहात गेम खेळणाऱ्या मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही,” असे म्हणत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना निवेदन दिले.
पाहा घटनेचा व्हिडिओ…
तटकरे यांच्या समोर टेबलावर पत्ते फेकले
निवेदन देत असताना त्यांनी निषेध म्हणून तटकरे यांच्या समोर टेबलावर पत्ते फेकले आणि “गेम खेळायचा असेल तर घरी खेळा!” अशा जोरदार घोषणा दिल्या. या वेळी छावा संघटनेने माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत, सभागृह हे जनतेच्या हिताचे कायदे बनवणारे पवित्र स्थान असल्याचे ठासून सांगितले. त्यांनी कोकाटे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त भावना व्यक्त केल्या.
विजयकुमार घाडगे पाटील यांना जोरदार मारहाण
अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर परिस्थिती चिघळली. निवेदन देऊन बाहेर पडलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी हल्ला चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांना जोरदार मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अचानक हल्ला
छावा संघटनेचे कार्यकर्ते रेस्ट हाऊसच्या दुसऱ्या खोलीत बसले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अचानक हल्ला चढवला, असा आरोप आहे. पोलिसांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली.
आम्ही फक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवेदन दिलं
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विजयकुमार घाडगे पाटील म्हणाले, “आम्ही फक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवेदन दिलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे मंत्री जर सभागृहात पत्ते खेळत असतील, तर त्यांच्याकडून शेतकऱ्यांचं भलं होईल का? या प्रश्नावर आम्ही आवाज उठवला. त्यानंतर आम्ही रेस्ट हाऊसमध्ये बसलो होतो, तेव्हा राष्ट्रवादीचे गुंड आमच्यावर तुटून पडले. सत्तेचा माज काय असतो, हे त्यांच्या वागण्यातून स्पष्ट झालं आहे. छावा संघटनेमध्ये शेतकऱ्यांची पोरं आहेत, आणि याचा योग्य वेळी हिशोब घेतला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.