
विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून ठाकरे गटावर टीका करणाऱ्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना खडेबोल सुनावलेत. पीठासीन अधिकाऱ्याने एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी आपली मर्यादा पाळावी, असे त्यांन
.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे गटात गिफ्टच्या मोबदल्यात पदे मिळत असल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी हे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच वावटळ सुटली असताना विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी त्यांना स्वतःच्या मर्यादा सांभाळून बोलण्याचे खडेबोल सुनावलेत.
मत प्रतिकूल असले तरी मर्यादा पाळा
विधान परिषदेचे सभापती व उपसभापती हे पद घटनात्मक आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून हे पद उच्च आहे. त्याची प्रतिष्ठाही वेगळी आहे. त्यामुळे त्याचा आदर बाळगला गेलाच पाहिजे. पीठासीन अधिकाऱ्याने एखाद्या विषयावर स्वतःचे मत प्रतिकूल असले तरी आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे राम शिंदे यांनी यांनी म्हटले आहे.
राम शिंदे यांनी यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार नाही या विधानाचाही समाचार घेतला. अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार नाही हे विखे पाटलांचे वैयक्तिक मत असू शकले. पण जिल्हा विभाजनाचा विषय सभागृहात उपस्थित झाला तर त्या चर्चेला कशी कलाटणी देता येईल हे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहील, असे ते म्हणालेत.
नीलेश लंकेच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार
पाथर्डीतील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मढी ग्रामपंचायतीने घेतला आहे. तसेच अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासनाला समोर करून सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेल्या कथित गुंडगिरीच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगरचा बिहार झाल्याची टीका केली आहे. राम शिंदे यांनी या प्रकरणी सावध भूमिका घेत त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.
आता पाहू काय म्हणाल्या होत्या नीलम गोऱ्हे?
नीलम गोऱ्हे यांनी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचे कारण नाही. 2012 वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की, शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळते ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते. नंतर अवनती होत गेली, असे त्या म्हणाल्या होत्या.
शरद पवारांनी घेतला नीलम गोऱ्हे यांचा समाचार
शरद पवारांनी या प्रकरणी नीलम गोऱ्हे यांचा समाचार घेत त्यांचे हे विधान मूर्खपणाचे असल्याचे म्हटले होते. नीलम गोऱ्हेंनी असे भाष्य केले नसते तर योग्य झाले असते. त्यांनी केलेले विधान हे अयोग्य आहे. गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी जे सांगितले, ते शंभर टक्के बरोबर आहे. त्यांनी यासंबंधीचे भाष्य या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती. जे अधिवेशन अतिशय चांगले चालले होते, सर्वांचा सहभाग आहे, त्यामध्ये नको त्या गोष्टी काढायचे कारण नव्हते.
नीलम गोऱ्हेंनी ‘एका पदासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागायच्या,’ असे वक्तव्य केले. मला असे वाटते की, महाराष्ट्र विधिमंडळात त्यांच्या चार टर्म झाल्या, या सगळ्या टर्म त्यांनी कशा मिळवल्या, हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, असा टोलाही पवारांनी या प्रकरणी गोऱ्हे यांना हाणला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.