
महायुती सरकारची महत्वकांक्षी लाडकी बहीण योजना आता इतर महत्वाच्या विभागांच्या मुळावर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने या योजनेसाठी तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळता केला आहे. यामुळे आपसूकच नीती आयोगाच्या नियमांना पुन्
.
सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करत आहे. पण यासाठी निधी उभा करताना त्याची मोठी दमछाक होत आहे. सरकारने या योजनेला लागणाऱ्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. पण त्यानंतरही इतर विभागांचा निधी वळता करून सरकार दिवस काढण्याचे काम करत आहे हे वेळोवेळी स्पष्ट होत आहे.
आदिवासी खात्याचा निधी तिसऱ्यांदा लंपास
ताज्या माहितीनुसार, सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळता केला आहे. यासाठी नीती आयोगाच्या नियमांना हरताळ फासला आहे. सरकारने यापूर्वीही दोनदा आदिवासी विभागाचा एवढाच निधी वळता केला होता. आता तिसऱ्यांदा या विभागाच्या निधीवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे नीती आयोगाने सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विभागाला पाठवलेल्या पत्रात दलित व आदिवासी समाजाचा निधी इतर कोणत्याही योजनेसाठी न वापरण्याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले होते.
आदिवासी विभागाने हेच दिशानिर्देश व नियमांच्या आधारावर हा निधी हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. नियमानुसार, आदिवासी विभागाचा निधी त्याच विभागाच्या लाभार्थ्यांसाठी वापरला जातो. पण अजित पवारांच्या नेतृत्वातील अर्थखात्याने या नियमाकडे दुर्लक्ष करत आदिवासी खात्याचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वळता केला आहे.
निधी पळवला असे म्हणणे अपप्रचार – आदिवासी विकास मंत्री
दुसरीकडे, आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी आपल्या विभागाचा निधी पळवणे हा अपप्रचार असल्याचे म्हटले आहे. आदिवासी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला असे म्हणण्यात अर्थ नाही. आमच्या विभागाला मागच्या वर्षीपेक्षा 100 टक्के जास्त बजेट वाढवून मिळाले आहे. त्यामुळे विभागाची कोणतीही योजना बंद होणार नाही. केंद्र सरकार 100 टक्के आदिवासी विभागाच्या पाठिशी आहे. केंद्राच्या माध्यमातून विविध योजनांसाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे निधी पळवल्याचा अपप्रचार थांबवावा ही विनंती आहे, असे ते म्हणालेत.
संजय शिरसाट यांनी केली होती टीका
उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या खात्याचा 746 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळता केल्याच्या मुद्यावरून नुकतीच अजित पवारांवर टीका केली होती. समाजकल्याण विभागाच्या अर्थसंकल्पी तरतुदीतील 746 कोटींचा निधी लाडकी बहीण योजेनसाठी वळवण्यात आला. ही कृती बेकायदा व अन्यायपूर्ण आहे. या खात्याचा निधीच वळता करायचा असेल तर कशाला शिष्यवृत्ती द्यायची? कशाला वसतिगृहे चालवायची? असा संतप्त सवाल त्यांनी यासंबंधी केला होता.
यापूर्वीही पूर्वीही माझ्या खात्यातून 7 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. याची मला कल्पनाही नाही. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर किंवा त्या खात्यात निधीच द्यायचा नसेल तर हे खाते बंद केले तरी चालेल. असा निधी वळवणे हे नियमबाह्य आहे. पण अर्थखात्याला जे वाटते तेच खरे असते. सध्या त्यांची मनमानी सुरू आहे, असेही ते आपली नाराजी व्यक्त करताना म्हणाले होते.
हे ही वाचा…
अजित पवार, एकनाथ शिंदे संवादात चांगले नाहीत:फडणवीसांचे रोखठोक विधान, शरद पवारांचे कौतुक; महायुतीत सर्वकाही ठीक?
मुंबई – राजकारण हा शक्य व अशक्यतेचा एक क्लिष्ट खेळ आहे. रणनीती, सत्ता व सामाजिक आकांक्षांचा मेळ साधत सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच राजकारणात कुणीच कुणाचा कायमस्वरुपी शत्रू किंवा मित्र नसतो असे म्हटले जाते. सांगायचे असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत आपले दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे अजित पवार व एकनाथ शिंदे हे संवादात चांगले नसल्याचे विधान केले आहे. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीत सर्वकाही चांगले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.