
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागांना येत्या महिनाभरात वाढीव पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. योजनेच्या चाचणीतील तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर ही महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. योजनेच्या जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया सोमवारपासून पुन्हा सुरू झाली. सकाळी ११ वाजता जायकवाडी येथील पंप सुरू करण्यात आले. ढोरकीन येथील बिघाडामुळे रिकामी झालेली पाईपलाईन सायंकाळी सात वाजेपर्यंत पूर्णपणे भरण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा पंप सुरू करून, दुपारी २ वाजेपर्यंत नर्सरी ओलांडून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात घेण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्रात जॅकवेलमधून पाणी घेतल्यानंतर आता संपूर्ण पाईपलाईनची स्वच्छता केली जाईल. या प्रक्रियेत ३८ किलोमीटर अंतरावरील १२ ‘स्कोअर व्हॉल्व्ह’ उघडून पाणी सोडून दिले जाईल, ज्यामुळे पाईपलाईन स्वच्छ होईल. पाईपलाईन पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा नव्याने पाणी भरून अंतिम चाचणी घेतली जाईल. या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होण्यास मे महिना उजाडण्याची शक्यता आहे. ढोरकीन येथील व्हॉल्व्ह तुटल्यामुळे चाचणीला काही दिवसांचा विलंब झाला असला, तरी आता काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहराकडे येणाऱ्या १५०० मिमी आणि २००० मिमी अशा दोन मुख्य जलवाहिन्यांची कामे सध्या प्रलंबित आहेत. प्रशासनाने प्रथम १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे. ‘लो लेव्हल एमबीआर’ मधून मे महिन्यात शहरात पाणी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे काम यशस्वी झाल्यानंतर २००० मिमी जलवाहिनीच्या कामाला गती दिली जाईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






