
पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोयना जलसागराला आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने कोयना जलसागराच्या नामांतराचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कोयना जलसागराचे नामांतर करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नामांतरास मंजुरी दिली. त्यानंतर राज्य शासनाने अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला. शासन निर्णयामुळे नामांतराला अधिकृत मान्यता शासन निर्णय जारी झाल्यानंतर कोयना जलसागराची अधिकृत ओळख ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ अशी राहणार आहे. यापुढे शासनाच्या सर्व पत्रव्यवहार, अभिलेख, अधिकृत कागदपत्रे आणि शासकीय नोंदींमध्ये याच नावाचा उल्लेख केला जाणार आहे. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करणारा हा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले. पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या जलसागराला नवी ओळख कोयना धरण आणि त्यामागील विशाल जलसागर हा पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन, पाणीपुरवठा आणि जलविद्युत निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या या जलसागराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. इथून पुढे नव्या नावानेच उल्लेख होणार जलसागराचे नामांतर करण्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानंतर शासन निर्णय जारी झाल्याने येथून पुढे शासनाचा पत्रव्यवहार आणि अभिलेखा मध्ये तसा उल्लेख करण्यात येईल. कोयना धरणाची थोडक्यात माहिती सांगली, सातारा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या कोयना धरणाला ‘महाराष्ट्राची भाग्यरेखा’ म्हणून ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात हेळवाक जवळ कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. प्रकल्पाची संकल्पना: कोयना नदीच्या पाण्याचा वापर करून वीज व पाणी उपलब्ध करून देण्याची पहिली शक्यता विसाव्या शतकाच्या सुरुवातीला (१९२० च्या दशकात) टाटा समूहाने आणि ब्रिटिश अभियंत्यांनी वर्तवली होती. स्वातंत्र्यानंतर या प्रकल्पाची प्रत्यक्ष आखणी झाली. बांधकाम आणि उद्घाटन: धरणाचे काम १९५४ मध्ये अधिकृतपणे सुरू झाले. पहिल्या टप्प्यातील जलविद्युत निर्मितीचे काम पूर्ण झाल्यानंतर १९६२ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. १९६७ चा भीषण भूकंप: ११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना परिसरात ६.३ रिश्टर स्केलचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला. यामुळे मोठा ताण निर्माण झाला असला तरी धरणाची भिंत सुरक्षित राहिली. या घटनेनंतर जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून धरणाची भिंत अधिक मजबूत करण्यात आली. ‘शिवसागर’ जलाशय आणि तंत्रज्ञान: कोयना धरणाच्या अथांग साठ्याला ‘शिवसागर जलाशय’ असे नाव देण्यात आले. या धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता सुमारे १०५ टीएमसी आहे. १९९९ मध्ये भारतात पहिल्यांदाच ‘लेक टॅपिंग’ हा अनोखा प्रयोग कोयना धरणात यशस्वीरीत्या करण्यात आला, ज्यामुळे पाण्याच्या खालच्या थरातूनही वीजनिर्मिती करणे शक्य झाले. आता राज्य सरकारने या जलशयाचे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामांतर केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/