
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात ‘पेट स्कॅन’ चाचणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. आता कर्करुग्णांना १५,४८७ रुपयांऐवजी केवळ ३,००० रुपये मोजावे लागतील. वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या सूचनेनुसार हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला असून, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी ही माहिती दिली. पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर ही सुविधा २ जुलैपासून सुरू झाली आहे. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर ही मशीन जुलैमध्ये कार्यान्वित झाली. राज्यात सरकारी पातळीवर ‘पेट स्कॅन’ सुविधा असलेले छत्रपती संभाजीनगर हे एकमेव कर्करोग रुग्णालय आहे. सुरुवातीला, केंद्र सरकारच्या दरांपेक्षा १८.५ टक्के कमी, म्हणजेच १५,४८७ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते. मात्र, २०१७ च्या शासन निर्णयानुसार, आता सामान्य रुग्णांकडून केवळ ३,००० रुपये आकारले जातील. उर्वरित १२,४८७ रुपयांचा भार शासकीय कर्करोग रुग्णालय उचलणार असून, ही फरक रक्कम कंत्राटदाराला रुग्णालयातर्फे दिली जाईल. दारिद्र्यरेषेखालील (पिवळे रेशन कार्डधारक) रुग्णांसाठी ही अत्याधुनिक ‘पेट स्कॅन’ चाचणी पूर्णपणे मोफत असेल. ही चाचणी ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’मध्ये समाविष्ट करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहितीही डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/