
वांद्रे येथील प्रसिद्ध ‘रंगशारदा’ हॉटेलवर ईडीने धडक कारवाई करत, कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात तब्बल 332 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. म्हाडाकडून सांस्कृतिक उपक्रमांसाठी सवलतीच्या दरात मिळालेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला असून, याच आर्थिक फसवणुकीप्रकरणी प्रभुदास लोटिया यांच्यावर मुख्य आरोप करण्यात आले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाने मराठी नाट्य, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने ‘रंगशारदा प्रतिष्ठान ट्रस्ट’ला हा भूखंड सवलतीच्या दरात दिला होता. परंतु संबंधित व्यक्तींनी या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करून भूखंड वाटपाच्या मूळ अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ईडीच्या तपासात असे उघडकीस आले आहे की, ‘रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड’ने नियमानुसार नाट्यगृह आणि कलाकारांच्या निवासाची जागा ट्रस्टकडे हस्तांतरित न करता, कोणत्याही कायदेशीर मंजुरीशिवाय त्याच जागेवर हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, बार आणि बँक्वेट हॉल यांसारख्या व्यावसायिक आस्थापना बेकायदेशीरपणे चालवल्या. प्रभुदास वीरचंद लोटीया यांनी ‘ट्रस्ट’च्या जमिनीवर उभारलेल्या व्यावसायिक जागांची बेकायदेशीरपणे विक्री करून त्यातून मिळालेल्या रकमेतून प्रभादेवीत दुसरी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला असून, या तपासात आतापर्यंत तब्बल 512 कोटी रुपयांची गुन्ह्यातील कमाई (प्रोसीड्स ऑफ क्राईम) निष्पन्न झाली आहे. यापूर्वी अनिल अंबानी समूहाविरुद्धही धडक कारवाई करत 3,084 कोटी रुपयांच्या 40 हून अधिक मालमत्ता जप्त करणाऱ्या ईडीने आता या प्रकरणातही फास आवळल्याने, तपासात पुढे काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/