
महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) च्या पहिल्या वर्षातील विद्यार्थिनींनी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील पारगाव तर्फ खेड येथील पारंपरिक बांधकामशैलीचा अभ्यास करून त्याचे प्रदर्शन भरवले आहे. ग्रामीण भागातील घरे स्थानिक भौगोलिक स्थिती आणि हवामानानुसार शाश्वत बांधकामे कशी असतात, हे या अभ्यासातून मांडण्यात आले. हा चार दिवसीय अभ्यास ऊर्वी पब्लिक ट्रस्टच्या सेक्रेटरी अमृता नायडू यांच्या सहकार्याने पारगाव तर्फ खेड येथे करण्यात आला. बीएनसीएच्या पहिल्या वर्षातील ४३ विद्यार्थिनी या प्रकल्पात सहभागी झाल्या होत्या. या विद्यार्थिनींना महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. ध्रुव चंदवानिया, प्रा. अपर्णा कुलकर्णी, प्रा. श्वेता अलबाळ, प्रा. सायली कुलकर्णी आणि प्रा. दीप्ती नातू यांनी मार्गदर्शन केले. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी सांगितले की, दगड, विटा, माती आणि लाकडाचा वापर करून बांधलेली पारंपरिक घरे हीच खऱ्या अर्थाने शाश्वत घरे असतात. वास्तूरचनाशास्त्राच्या विद्यार्थिनींमध्ये हा विचार सुरुवातीपासूनच रुजवण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. डॉ. ध्रुव चंदवानिया, प्रा. अपर्णा कुलकर्णी आणि प्रा. श्वेता अलबाळ यांनी नमूद केले की, पुणे जिल्ह्यातील छोट्या गावांमध्ये जाऊन तेथील बांधकामशैली आणि राहणीमानाचा अभ्यास करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. पारंपरिक बांधकामशैली आणि आधुनिक राहणीमान यांची सांगड गावकरी कसे घालतात, याचाही अभ्यास करण्यात आला. विद्यार्थिनींनी पारंपरिक बांधकामशैली आजच्या काळातील गरजांना कशी पूरक ठरू शकते, याचे विश्लेषण केले. तसेच, गावकऱ्यांना पारंपरिक, हवामानपूरक आणि स्थानिक उपलब्ध सामग्रीपासून बांधलेल्या वास्तूंचे फायदे सांगून लोकजागृती करणे हा देखील या प्रकल्पाचा एक भाग आहे. या विद्यार्थिनींनी गावातील सहा पारंपरिक घरे आणि वेशीवरील हनुमान मंदिराचा अभ्यास केला. गावात उपलब्ध असणारी दगड, माती, विटा आणि लाकूड यांसारखी पारंपरिक सामग्री तापमान नियंत्रणात किती प्रभावी आहे, याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. गावकऱ्यांशी संवाद साधून पारंपरिक बांधकाम पद्धतींबद्दल माहिती गोळा केली. गावाजवळच्या माळरानावर सुमारे २०० एकर जमिनीवर ‘फोर्टीन ट्रीज फौंडेशन’तर्फे वनीकरण प्रकल्प उभारला जात आहे. विद्यार्थिनींच्या अभ्यास, निरीक्षणे आणि विश्लेषणाच्या आधारे या वनक्षेत्रात ‘व्हिजिटर्स सेंटर’चा प्रस्ताव देण्यात येणार आहे. तसेच, गावातील पडझड झालेल्या वास्तूंमधील बांधकाम सामग्री वापरून मुक्ताई मंदिराजवळ ‘नाना नानी पार्क’चा प्रस्तावही बीएनसीएच्या विद्यार्थिनी देत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






