
हिंगोली तालुक्यातील बासंबा येथील शेतकऱ्याला शेती मोजणीची सीट देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतांना उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील दोन भुकरमापकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ता. २२ दुपारी रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बासंबा येथील एका शेतकऱ्याने त्याच्या शेत जमीनीची मोजणी करून घेतली होती. त्यानुसार उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील भुकर मापकांनी जमीनीची मोजणी केली. त्यानंतर शेतकऱ्याने मोजणी सीट मागितली असता त्यांना १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. मात्र त्यानंतर तडजोडीनुसार १० हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने हिंगोलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने पंचा समक्ष पडताळणी केली असता मोजणीच्या वेळी ४ हजार रुपये घेतल्याचे दोघांनी मान्य केले होते. आता १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यावरून आज लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक सुलभा राऊत, पोलिस उपनिरीक्षक विजय शुक्ला, जमादार भगवान मंडलिक, राजाराम फुफाटे, विनोद पुंडगे, शेख युनूस, शेख अकबर, शिवाजी वाघ, अमोल जाधव यांच्या पथकाने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला होता. ठरल्या प्रमाणे संबंधित शेतकऱ्याकडून भुकरमापक उमेश राऊत याने लाच मागितली अन अविनाश गोरे याने लाचेची रक्कम घेतली. त्यांनी लाचेची रक्कम घेताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






