
प्रतिनिधी | पाचोड मुस्लिम बांधवांच्या पवित्र ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर पाचोड येथील जनावरांच्या बाजारात रविवारी मोठी उलाढाल झाली. कुर्बानीसाठी बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यंदा बाजारात बोकडांचे दर गगनाला भिडले असून, आकर्षक आणि धष्टपुष्ट बोकडांना ३० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अवघ्या एका दिवसात या बाजारात लाखो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. येत्या २८ मे रोजी बकरी ईद साजरी होत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून खरेदीला वेग आला आहे. एरवी १० ते २० हजार रुपयांना मिळणारे बोकड यंदा थेट २५ ते ३० हजारांच्या घरात पोहोचले आहेत. पहाटेपासूनच विविध भागांतील मेंढपाळ आणि शेतकरी आपली जनावरे विविध वाहनांतून घेऊन बाजार आवारात दाखल झाले होते. मागणी वाढल्याने पशुपालक आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. कुर्बानीसाठी बकऱ्याचे सौंदर्य, वजन आणि शिंगांची ठेवण याला विशेष महत्त्व दिले जाते. यामुळेच यंदा बाजारात पांढऱ्या शुभ्र आणि वजनदार बोकडांना ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजली जात आहे. सरासरी चांगल्या प्रतीच्या बकऱ्यांना ४० हजारांचा भाव मिळत असल्याची माहिती बाजार प्रशासनाने दिली. काही खास बोकडांची किंमत ५० हजारांच्या पुढे गेल्याची चर्चा बाजारात रंगली होती.आकर्षक आणि धष्टपुष्ट बोकडांना ३० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बकरी ईदमुळे खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. अपेक्षेपेक्षा जास्त दर बकरी ईदच्या निमित्ताने यंदा पाचोड बाजारात बोकडांना अपेक्षेपेक्षा जास्त दर मिळत आहे. आवक चांगली असली तरी मागणी दुपटीने वाढल्याने किमतीत मोठी वाढ झाली आहे. चांगल्या वजनाच्या बकऱ्यांसाठी ग्राहक ५० हजारांपर्यंत किंमत मोजायला तयार असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






