
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नांदगाव पेठ ग्रामपंचायतीने अमरावती तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामविकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि नागरिकाभिमुख उपक्रम यावर भर देत ग्रामपंचायतीने हे यश संपादन केले. गावातील विविध विकासकामे, स्वच्छ व सुंदर परिसर, पाणीपुरवठा व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि ग्रामविकासाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन ही निवड करण्यात आली. या कामगिरीबद्दल ग्रामपंचायत प्रशासन, पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. बीडीओ सुदर्शन तुपे, जिल्हा परिषद अधिकारी गवई, श्रीमती लाड, हनुमान सिडाम, मिलिंद ठुणुकले आणि अतुल दिहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने ही यशस्वी कामगिरी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस तसेच सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. ग्रामपंचायत अधिकारी हर्षदा बोंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात नांदगाव पेठ ग्रामपंचायतीला अमरावती तालुक्यात प्रथम क्रमांक मिळणे हे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. पुढील काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” सरपंच तथा प्रशासक कविता डांगे यांनी विश्वास व्यक्त केला की, “ग्रामस्थांचे सहकार्य, प्रशासनाचे मार्गदर्शन आणि ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण विकासकामांमुळे हे यश शक्य झाले. यापुढील मूल्यांकनासाठी चंद्रपूरहून येणाऱ्या समितीसमोर नांदगाव पेठची आदर्श कामगिरी निश्चितच ठसा उमटवेल.” ग्रामपंचायतीच्या या यशामुळे भविष्यात जिल्हा तसेच राज्यस्तरावरही नांदगाव पेठचे नाव झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






