
पुणे ग्रामीण पोलिसांनी जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, नारायणगाव आणि पारगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये 3 सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे एकूण 8 गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून सुमारे 36 लाख रुपये किमतीचे 24 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत नारायणगाव एस.टी. स्टँड परिसरात महिला प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मीरा गणपत शिंदे (रा. बोरी खु., जुन्नर) आणि भागवत निवृत्ती गाडगे (रा. उंब्रज, जुन्नर) यांनी पोलिसांत तक्रारी नोंदवल्या होत्या. या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके तयार केली होती. तब्बल 20 दिवस सुमारे 200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अर्जुन कानिफनाथ भोसले (वय 27 वर्षे, मूळ रा. श्रीरामपूर, सध्या रा. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) याला भोसरी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अर्जुन भोसलेने गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्द्मालापैकी 27 लाख रुपये किमतीचे सुमारे 18 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. दुसऱ्या एका कारवाईत, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर आणि पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. काळ्या-लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून येऊन दोन आरोपी जबरी चोरी करत होते. पोलिसांनी महिनाभराचे सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त माहितीच्या आधारे शिंगवे परिसरात सापळा लावून ओंकार रंगनाथ शेंडगे (वय 19 वर्षे, रा. डोंगरगण, शिरूर) आणि अजय बाळु देवकर (वय 27 वर्षे, रा. कवठेयेमाई, शिरूर) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 9 लाख रुपये किमतीचे 6 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. त्यांच्यामुळे पारगाव, शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव येथील एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (शिरूर) आणि धनंजय पाटील (जुन्नर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
