
मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे विवाहित महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५, रा. ब्रम्हपुरी) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून, फिर्याद मयत महिलेचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण (वय ५१, रा. अर्धनारी) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी, समाज माध्यमावर रिलस्टार म्हणून सर्वत्र परिचित असणाऱ्या रोहिणी निलेश पाराध्ये यांनी २६ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास गावाजवळ असणाऱ्या ग्रामपंचायत हॉटेलमधील स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मयत म्हणून नोंद घेतली होती. मयत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी निलेश विलास पाराध्ये (रा. ब्रम्हपुरी, ता. मंगळवेढा) हा गेल्या सुमारे १ वर्षापासून पत्नीला घरगुती कारणांवरून वारंवार त्रास देत होता. रोहिणी हिची इच्छा नसताना तिला हॉटेलमध्ये काम करण्यास भाग पाडणे, सतत वाद घालणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे तसेच दमदाटी करून मानसिक व शारीरिक छळ करणे, असे प्रकार सुरू असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात आरोपी पती निलेश विलास पाराध्ये याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करीत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
