
तिवसा नगरपंचायतीच्या १२ काँग्रेस नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. पक्षाच्या आदेशाचे पालन करत हे नगरसेवक रातोरात शिर्डीला रवाना झाले होते. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, १५ पैकी उर्वरित तीन नगरसेवकांनी मात्र मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदारसंघात पाय ठेवला नाही. त्यांच्या आजारपणामुळे ते रुग्णालयात दाखल आहेत. यामुळे स्थानिक नेतेमंडळी आणि उमेदवार यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तटस्थ राहण्याचा व्हीप (पक्षादेश) जारी केला होता. या व्हीपचे पालन करत १२ नगरसेवकांनी तिवसा येथे न थांबता रातोरात शिर्डी गाठली. शिर्डीत साई दर्शनाला गेलेल्यांमध्ये नगराध्यक्ष प्रतिभाताई गौरखेडे, उपाध्यक्ष प्रियाताई विघ्ने आणि गटनेते किसन मुंदाने यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत नगरसेवक योगेश वानखडे, वैभव वानखडे, अमर वानखडे, नरेश लांडगे, प्रीती भूरभूरे, अर्चना भोंबे, मंगला बाखडे, प्रतिभा भगत आणि माधुरी पुसाम हे देखील होते. दरम्यान, पक्षादेश झुगारून मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेणारे तीन नगरसेवक आहेत. यामध्ये सीमा खाकसे, संगीता राऊत आणि स्वीकृत नगरसेवक सचिन गोरे यांचा समावेश आहे. आता त्यांच्याबाबत पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
