
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे २२ ते २८ जुलैदरम्यान बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) तपासणी शिबिरास प्रारंभ झाला आहे. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागामार्फत डॉ. एम. बी. लिंगायत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन केले आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) ही एक वैद्यकीय चाचणी आहे, जी हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिजांचे प्रमाण मोजते. या चाचणीमुळे हाडे किती मजबूत आहेत किंवा ती ठिसूळ झाली आहेत का, हे ठरवता येते. सांधेदुखी, पाठदुखी किंवा हाडांच्या आजारांचे वेळीच निदान करणे आणि फ्रॅक्चरचा धोका टाळणे हा या तपासणीचा मुख्य उद्देश आहे. ही तपासणी छोट्या मशीनद्वारे सामान्यतः हाताच्या किंवा पायाच्या घोट्याच्या हाडांची घनता मोजून केली जाते. घाटीतील अस्थिव्यंगोपचार विभागाच्या ओपीडी ११६ मध्ये दररोज ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. याव्यतिरिक्त, शुक्रवार, २४ जुलै रोजी पैठण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात, तसेच सोमवार, २७ जुलै रोजी गंगापूर आणि कन्नड येथेही ही सेवा दिली जाईल. अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी गरजू रुग्णांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. के. डी. गर्कल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत, अभ्यागत समिती सदस्य राजू अहिरे, प्रा. डॉ. अनिल धुळे, डॉ. गजानन देशमुख, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. निलेश कचनेरकर, डॉ. प्रवीण रणवीर, ओपीडी इन्चार्ज निर्मला शिंदे, सीमा भोसले यांच्यासह सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/