
पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेडची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि लष्करी वाहन उत्पादक एएम जनरल यांच्यात पॅरिसमध्ये धोरणात्मक भागीदारी करार झाला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित ‘युरोसॅटरी संरक्षण प्रदर्शनात’ या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या भागीदारीमुळे जगभरातील लष्करी दलांसाठी प्रगत, हलक्या वजनाची आणि अत्यंत टिकाऊ ‘माउंटेड आर्टिलरी गन सिस्टीम’ उपलब्ध होणार आहे. या सहकार्याचा मुख्य उद्देश मित्रराष्ट्रांना दुर्गम परिस्थिती, प्रतिकूल हवामान आणि कोणत्याही भूभागावर सहज वापरता येणारी ‘माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्म’ पुरवणे हा आहे. ही प्रणाली आधुनिक आणि जलद गतीने बदलणाऱ्या युद्धपरिस्थितीत सैन्य दलांना महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून देण्यास सक्षम असेल. या भागीदारीच्या पहिल्या टप्प्यात, एएम जनरलने अमेरिकन लष्कराच्या ‘मोबाईल टॅक्टिकल कॅनन’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये केएसएसएलच्या 155 मिमी तोफखाना डिझाइनवर आधारित युद्धसिद्ध प्रणाली विकसित करण्याचा समावेश आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास, 2027 पर्यंत या यंत्रणेचे वितरण करण्याचे नियोजन आहे. या विशेष तोफखाना प्रणालीमध्ये (एमएआरजी) 52 कॅलिबरची 155 मिमी तोफ, स्वयंचलित लोड-सहाय्य यंत्रणा आणि सर्व हवामानात काम करणारी प्रगत फायर कंट्रोल यंत्रणा समाविष्ट आहे. यात पेटंटप्राप्त ‘सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी’ वापरली आहे, ज्यामुळे तोफेचा झटका प्रभावीपणे शोषला जातो. यामुळे वाहनाचे एकूण वजन कमी राहते आणि शस्त्रप्रणालीवरील ताण कमी होतो. ही यंत्रणा 40 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मारा करू शकते, तसेच यात 20 पेक्षा जास्त दारूगोळा साठवण्याची क्षमता आहे. हे तंत्रज्ञान लष्कराला अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनवेल. या भागीदारीबाबत बोलताना भारत फोर्जचे उपाध्यक्ष अमित कल्याणी म्हणाले की, “आमच्या प्रगत तोफखाना तंत्रज्ञानावर दाखवलेला विश्वास महत्त्वपूर्ण असून याद्वारे जागतिक दर्जाची उत्पादने लष्कराला मिळतील.” एएम जनरलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चॅडबोर्न यांनी सांगितले की, या करारामुळे रणांगणावर सैनिकांचे सामर्थ्य वाढवणारी प्रगत यंत्रणा सज्ज होईल. केएसएसएल ही भारतात अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाची संरक्षण उत्पादने विकसित करत असून, लष्करी सामर्थ्य मजबूत करणे हे कंपनीचे ध्येय आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
