
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आता एका अत्यंत वेगळ्या भूमिकेतून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. दिग्दर्शक श्रेयस जाधव आणि निर्माते अमोल बोरकर यांच्या ‘गजरा’ या आगामी मराठी चित्रपटात अदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे रसिकांची उत्सुकता वाढली आहे. सध्या या चित्रपटाचे काम वेगाने सुरू असून, २०२७ मध्ये ‘गजरा’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अदाचा हा मराठीतील पहिलाच प्रयोग बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर काय जादू करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पोस्टरने वाढवली उत्सुकता; अंगावर काटा आणणारा लूक नुकतेच ‘गजरा’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, या पोस्टरमधील अदाच्या रौद्र आणि थरारक अवताराने सध्या सिनेप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयस जाधव यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार, “हा सिनेमा पूर्णपणे सत्य घटनांवर आधारित असून, समाजातील एका अत्यंत संवेदनशील विषयाला यात वाचा फोडण्यात आली आहे. या भूमिकेसाठी आम्हाला एका अशा चेहऱ्याची गरज होती, ज्याच्यात कमालीची निरागसता आणि तितकाच तीव्र संताप (रौद्ररूप) एकाच वेळी दिसेल. अदा शर्मा या चौकटीत अगदी चपखल बसली.” ‘ही केवळ एका पात्राची गोष्ट नाही…’ — अदा शर्मा आपल्या या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाविषयी बोलताना अदा शर्मा कमालीची उत्सुक दिसली. ती म्हणाली, “मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. जेव्हा मी ‘गजरा’ची कथा ऐकली, तेव्हाच मला समजले की ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही, तर समाजातील अनेक न बोलल्या गेलेल्या जळजळीत वास्तवांना दिलेला हा एक आवाज आहे. या आव्हानात्मक पात्रासाठी मला मानसिक आणि भावनिक स्तरावर खूप पूर्वतयारी करावी लागली. मराठी भाषा, संस्कृती आणि येथील प्रेक्षकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करेल आणि स्त्रीशक्तीची एक नवी व्याख्या समोर आणेल.” चित्रपट सत्य घटनेवर आधारित अदा शर्माने एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यात ती म्हणते, ‘गजरा – माझे मराठीतील पदार्पण… तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे!’ या पोस्टमध्ये तिने चित्रपटाची सविस्तर माहितीही दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयस जाधवचे आहे. तर निर्माता अमोल बोरकर आहेत. संगीत देवदत्त मनीषा बाजी यांचे असून झिग झॅग प्रॉडक्शन्स आणि गणराज स्टुडिओजने निर्मिती केली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, असल्याचेही अदाने म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited
