
इराण विरुद्ध अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे जगातील अनेक देशांत इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा मोठा फटका आता महाराष्ट्राला बसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल – डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधन मिळवण्याच्या शर्यतीत काही ठिकाणी वादाच्याही घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत डबल इंजिन सरकारमधील तेलही संपले का? असा तिखट प्रश्न उपस्थित केला आहे. मध्यपूर्वेत अमेरिका व इस्त्रायलने इराण विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे. पण होर्मुझची सामुद्रधुणी बंद असल्यामुळे येथून होणारी इंधनाची वाहतूक ठप्प पडली आहे. यामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. आमदार जयंत पाटील यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. डबल इंजिन सरकारच्या इंजिनमधील तेल पण संपले का? जयंत पाटील म्हणाले, जळगाव मध्ये पेट्रोल नाही म्हणून काही अज्ञातांनी पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू खुपसला. बुलढाण्यात पेट्रोल मिळण्याच्या आशेवर लोकं 12 तास लाइनमध्ये उभे राहिले, अकोलाच्या वाशिम नाका येथे पेट्रोल डिझेल मिळावे म्हणून हाणामारी. नागपूर मध्ये बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे डिझेल नाही. चालय तरी काय? डबल इंजिन सरकारच्या इंजिन मधील तेल पण संपले का? असा प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे. नागपूरच्या ग्रामीण भागात डिझेलचा कमी पुरवठा नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांना डिझेलचा कमी पुरवठा होत आहे. सध्या मिळणाऱ्या अपुऱ्या डिझेलमुळे शेतीच्या मशागतीची कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, एक बैलजोडी पोसण्यासाठी वर्षाकाठी जवळपास सव्वा लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे ते पोसायला परवडत नाहीत. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागतीची कामे करत आहेत. पण आता इंधन टंचाईमुळे ही कामे रखडली आहेत. ग्रामीण भागातील पंपचालक ट्रॅक्टर मालकांना 11 मेपासून दिवसाकाठी 10 ते 15 लिटर डिझेल देत आहेत. एवढ्या डिझेलमध्ये केवळ 3-4 तास नांगरटी किंवा वखरणी होते. उर्वरित 20 ते 21 तास ट्रॅक्टर तसाच बंद उभा राहतो. उधारीत पेट्रोल – डिझेल देणे बंद मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल पंप मालकांना 3-5 दिवस उधारित पेट्रोल – डिझेल द्यायचे. पण 21 मार्चनंतर कंपन्यांनी ही क्रेडिट पॉलिसी बंद करून अॅडव्हान्स पेमेंट सक्तीचे केले. त्यामुळे बहुतांश पंप मालक पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कमी मागवत आहेत. याचाही फटका ट्रॅक्टर चालकांना बसत आहे. नाशिक येथेही टंचाईचे सावट नाशिक शहरात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे. शहरातील त्र्यंबकरोड, वडाळारोड, पंचवटी, सातपूर, सिडको आदी भागांतील अनेक पेट्रोलपंपांवर मंगळवारी डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसल्या. काही पेट्रोलपंपांवर ‘डिझेल उपलब्ध नाही’, अशा पाट्या लावण्यात आल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही काही ठिकाणी बेहाल छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ चे फलक झळकत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पंपांवर वाहनांच्या रांगाच रांगा सध्या दिसत आहेत. शहर व ग्रामीण भागात एका दिवसांत 6 लाख 48 हजार पेट्रोल, तर 11 लाख 48 हजार लिटर डिझेलची विक्री झाली. बुलढाण्यात डिझेल पुरवठ्यावर मर्यादा बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यासह काही भागांत ट्रॅक्टरला मर्यादित डिझेल दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागात अस्वस्थता वाढली आहे. अनेक पंपांवर वाहनधारकांना केवळ एक ते दोन हजार रुपयांपर्यंतच डिझेल दिले जात आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, मालवाहतूक आणि कृषी यंत्रसामग्रीच्या कामांवर परिणाम होत आहे. बाजार समित्यांतील आवक – जावक व्यवस्थेलाही याचा फटका बसत आहे. गडचिरोलीत मालवाहतूक व्यावसायिकांची धावाधाव जिल्ह्यात गत 10-15 दिवसांपासून इंधन टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र मंगळवारी दिवसभर दिसून आले. या टंचाईचा फटका मालवाहतूक व्यावसायिक तसेच सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. त्यामुळे या सर्वांची मोठी धावाधाव सुरू आहे. जिल्ह्यातील 30 टक्के पंपांवर ‘नो डिझेल, नो पेट्रोल’चे फलक लावण्यात आलेत. सांगलीत माणीनुसार पुरवठा नाही सांगली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी मंगळवारी पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अनेक पंपांवर इंधनसाठा संपुष्टात आला असून, काही पंपांवर जेमतेम साठा आहे. सांगली – मिरजेतील पंपांवर गेल्या 4 दिवसांपासून दररोज वाहनचालकांची गर्दी होत आहे. तेल कंपन्यांकडून मागणीनुसार पुरेसा पुरवठा होत नसल्याचे पंपचालकांनी सांगितले. शिराळा तालुक्यातील सर्रास पंप सोमवारी बंद होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






