
पुण्यातील विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी एका दिमाखदार चित्रपट प्रमोशन कार्यक्रमाला गालबोट लागले. ‘कॉकटेल २’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च सोहळ्यासाठी आलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर, अभिनेत्री कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना यांना चाहत्यांच्या अनियंत्रित गर्दी आणि हुल्लडबाजीमुळे थेट धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे मॉलमध्ये अक्षरशः चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे हा कार्यक्रम अर्धवट गुंडाळावा लागला. मँडाँक फिल्म्सच्या वतीने मॉलच्या ‘अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ या खुल्या आवारात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी कोणतीही प्रवेशिका (पास) किंवा तिकीट ठेवले नव्हते. त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी पुणेकरांनी मॉलमध्ये अभूतपूर्व गर्दी केली. कलाकार मंचावर येताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला, मात्र काही क्षणांतच या उत्साहाचे रूपांतर हुल्लडबाजीत झाले. कलाकारांना जवळून पाहण्याच्या नादात अनेक तरुणांनी सुरक्षेसाठी लावलेले लोखंडी बॅरिकेड्स तोडून थेट मुख्य मंचाच्या दिशेने धाव घेतली. सुरक्षा यंत्रणा कोलमडली; पत्रकार आणि छायाचित्रकार जखमी अचानक वाढलेल्या या प्रचंड दबावामुळे मॉलची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आणि तैनात असलेले बाऊन्सर्स पूर्णपणे कोलमडून पडले. गर्दीवर नियंत्रण मिळवणे सुरक्षारक्षकांना अशक्य झाले. या गदारोळात आणि धक्काबुक्कीत बातमी कव्हर करण्यासाठी आलेले काही व्हिडिओ जर्नलिस्ट आणि छायाचित्रकार (फोटोग्राफर्स) खाली पडून जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शाहीद कपूरला धक्काबुक्की, कलाकारांनी व्यक्त केली नाराजी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच कलाकारांना सुरक्षितस्थळी हलवण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, गर्दीतून वाट काढताना अभिनेता शाहीद कपूरलाही जोरदार धक्काबुक्की झाली. पुण्यात यापूर्वी कधीही न आलेला अत्यंत वाईट आणि भीतीदायक अनुभव आल्याची नाराजी या कलाकारांनी बोलून दाखवली. आयोजकांच्या कारभारावर संताप कोणताही मोठा अनर्थ घडू नये म्हणून मँडाँक फिल्म्स आणि आयोजकांनी तातडीने पुढील सर्व कार्यक्रम रद्द केला. बाऊन्सर्सच्या मदतीने कलाकारांना अवघ्या काही मिनिटांतच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मॉल प्रशासनाने सेलिब्रेटींच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि गुप्त मार्ग (VIP रूट) न ठेवल्यामुळेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आता उपस्थित नागरिक आणि प्रत्यक्षदर्शी करत आहेत. दरम्यान, मॉलमध्ये झालेल्या या तुफान गर्दीचे, बॅरिकेड्स तोडतानाचे आणि सुरक्षा यंत्रणेची उडालेली तारांबळ दर्शवणारे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited
