
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी फुटल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असू
.
भिवंडीत पेपर फुटल्याचा संशय; पोलिसांच्या धाडीत उघड झाला प्रकार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 28 जून रोजी राज्यातील 1028 परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षेसाठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. मात्र 27 जूनच्या पहाटे भिवंडी परिसरात काही जणांकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेची माहिती असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
भिवंडी पोलिसांनी तातडीने धाड टाकून संबंधितांकडील कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासात संबंधितांकडे असलेले काही प्रश्न हे अधिकृत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळले. त्यानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
6 लाखांहून अधिक उमेदवारांना दिलासा
परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात उमेदवारांची कोणतीही चूक नाही. त्यामुळे ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवी तारीख दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल. त्यांनी सांगितले की, ही परीक्षा पुन्हा घेण्यासाठी नियोजनाची सुमारे तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
1028 केंद्रांवर पुन्हा होणार परीक्षा
राज्यातील 37 शहरांतील 1028 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी सुमारे 6 लाख 1 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे लाखो उमेदवारांवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे.
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर काय म्हणाले?
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, टीईटी परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठीच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या मते, नीट पेपरफुटीनंतर परीक्षा परिषदेने सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या. मात्र, भिवंडी परिसरात काही व्यक्तींकडे प्रश्नपत्रिका असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करून प्रश्नपत्रिका खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा रद्द करण्यात आली.
पूर्वतयारी असूनही पेपरफुटी
यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने मोठी सुरक्षा व्यवस्था उभारली होती. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक पडताळणी, फेस रेकग्निशन, मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित देखरेखीची व्यवस्था करण्यात आली होती. मोबाईल, स्मार्ट वॉच आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी घालण्यात आली होती. तरीही प्रश्नपत्रिका फुटल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेरंब कुलकर्णी यांची तीव्र प्रतिक्रिया
शिक्षण अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “नीटनंतर आता टीईटीचाही पेपर फुटला. माध्यमांनी बातम्या द्यायच्या, तज्ज्ञांनी प्रतिक्रिया द्यायच्या, सरकारने चौकशी जाहीर करायची आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करायचा, हे किती दिवस चालणार? यामुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांवरील विश्वास उडत आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, स्पर्धा परीक्षा हे आजच्या तरुणांसाठी रोजगाराचे महत्त्वाचे माध्यम आहे. मात्र वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांनंतरही जबाबदारी निश्चित होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
परीक्षा परिषद आणि शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, यामागील संपूर्ण रॅकेट उघड केले जाईल. केवळ पेपर मिळालेल्या व्यक्तींवरच नव्हे, तर प्रश्नपत्रिका बाहेर काढणारे आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. संबंधित बातमी वाचा…
उद्या होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द:भिवंडीतून प्रश्नपत्रिका विकणारे पोलिसांच्या ताब्यात; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातून पेपरफुटी झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे देशभरात नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथे वाचा सविस्तर बातमी
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
