
मैत्रिणीकडून होणारे ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका 14 वर्षीय शाळकरी मुलीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना अंबाजोगाईत समोर आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह अन्य दोन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. रिद्धी अशोक चाटे (वय 14) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. रिद्धीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तिची एक अल्पवयीन मैत्रीण आणि इतर दोन मुलांचा समावेश आहे. अवघ्या 15 मिनिटांत घडला अनर्थ मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे 2026 रोजी रिद्धीची आई नाईट ड्युटी संपवून सकाळी घरी आली आणि त्यानंतर नातेवाइकांच्या लग्नासाठी धारूरला गेली. दुपारी ऋद्धीने वडिलांकडे आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली. तिचे वडील आंबेडकर चौक येथे आईस्क्रीम आणण्यासाठी गेले. मात्र, ते अवघ्या 10 ते 15 मिनिटांत परत आले असता, घराचे दरवाजे आतून बंद होते. संशय आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा रिद्धीने फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ‘स्नॅपचॅट’ व्हिडिओ आणि छळाचे वास्तव सुरुवातीला रिद्धीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नव्हते. तिचे मामा खंडेराव माळवे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ऋद्धी एका अल्पवयीन मैत्रिणीच्या घरी गेल्याचे दिसले. अधिक चौकशी केली असता हे धक्कादायक गुपित उघड झाले. छुपा मोबाईल आणि सिमकार्ड रिद्धीच्या मैत्रिणीने लातूरहून आणलेला एक छुपा मोबाईल रिद्धीला वापरण्यासाठी दिला होता. या मोबाईलमधील सिमकार्ड एका दुसऱ्या मुलाचे होते, जे शाळेतील एका मुलीच्या सांगण्यावरून ऋद्धीला देण्यात आले होते. भीतीपोटी नंतर तो मोबाईल कचरा गाडीत टाकण्यात आला होता, जो पुढे फुटलेल्या अवस्थेत तिच्या मामांच्या हाती लागला. पालकांना व्हिडिओ पाठवण्याची धमकी रिद्धीच्या ‘स्नॅपचॅट’ अकाउंटवरून समोर आले की, शाळेच्या कॉम्प्युटर रूममधील काही वैयक्तिक व्हिडिओच्या आधारे तिच्याच मैत्रिणीने तिला वारंवार ब्लॅकमेल केले होते. हे व्हिडिओ तिच्या पालकांना पाठवण्याची धमकी ती देत होती. त्यामुळे रिद्धी मानसिक तणावात होती. फोनवरून मानसिक त्रास याशिवाय, एका अन्य अल्पवयीन मुलानेही रिद्धीला सतत फोन करून प्रचंड मानसिक त्रास दिला होता. या सततच्या त्रासाला आणि बदनामीच्या भीतीला कंटाळूनच रिद्धीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना कोणी त्रास देत आहे का, यावरही पालकांनी लक्ष ठेवायची गरज आहे. तीन अल्पवयीन संशयितांवर गुन्हा दाखल रिद्धीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानंतर 24 जून रोजी अंबाजोगाई शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तिची एक अल्पवयीन मैत्रीण आणि इतर दोन मुलांचा समावेश आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांची नावे गोपनीय ठेवली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
