
अचलपूर तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषद शाळेत यावर्षीपासून सहावी आणि सातवीचे वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या आंदोलनानंतर ही घोषणा केली. यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या वर्गांमुळे होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. यापूर्वी दोनोडा शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग होते. मात्र, शाळेची इमारत जीर्ण झाल्याने ती पडली आणि नवीन इमारत बांधकामाला वेळ लागल्याने सहावी व सातवीचे वर्ग खोल्यांअभावी बंद करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे ८ किलोमीटर दूर आसेगाव पूर्णा येथे शिक्षणासाठी जावे लागत होते. सध्या शाळेत फक्त पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू होते. पाचवी उत्तीर्ण सुमारे ३० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. यावर्षी पाचवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २५ तर सहावी उत्तीर्ण झालेल्यांची संख्या ३० आहे. विशेषतः मुलींना आसेगावला जाण्यासाठी वाहतुकीचे साधन नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची भीती होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी आज, बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अनेक महिन्यांपासून शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार आणि खासदारांना निवेदने देऊनही दाद मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांचे मनोबल खचले होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सीईओ सत्यम गांधी यांनी यावर्षीपासून दोन्ही वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे दोनोडा परिसरातील सांगवी, खैरी, वाठोणा, मुकिंदपूर, येवता या गावातील विद्यार्थ्यांनाही दोनोडा येथेच शिक्षण घेता येणार आहे. अशा प्रकारे दोनोडा शाळेला यावर्षीपासून उच्च प्राथमिक शाळेचा दर्जा मिळणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
