पुणे-पिंपरी-चिंचवडसाठी ‘डीएसएस’ प्रणालीचे उद्घाटन: स्वच्छ हवा व्यवस्थापनासाठी डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला बळ – Pune News

पुणे-पिंपरी-चिंचवडसाठी ‘डीएसएस’ प्रणालीचे उद्घाटन:  स्वच्छ हवा व्यवस्थापनासाठी डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला बळ – Pune News



सीआयआय क्लीनर एअर बेटर लाईफ (सीएबीएल), पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ हवेसाठी एका बहुभागधारक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी ‘डिसिजन सपोर्ट सिस्टिम’ (डीएसएस) या अभिनव प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सीआयआय क्लीनर एअर बेटर लाईफ उपक्रमाच्या अध्यक्ष श्वेता आर्या यावेळी उपस्थित होते. हा अशा प्रकारचा पहिलाच प्लॅटफॉर्म असून, डेटा-आधारित हवेच्या गुणवत्ता व्यवस्थापनासाठी आणि निर्णय प्रक्रिया सक्षम करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे शहर प्रशासनाला हवेच्या गुणवत्तेशी संबंधित माहिती अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असून, तिचे विश्लेषण आणि वापर करणे सुलभ होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी ही ‘डिसिजन सपोर्ट सिस्टिम’ (डीएसएस) ‘एअरव्हॉइस’तर्फे विकसित केली गेली आहे. ही प्रणाली ७२ तास आधीपर्यंतच्या हवेच्या गुणवत्तेचा उच्च-रिझोल्युशन अंदाज प्रदान करेल. स्थानिक उत्सर्जन नोंदी, सविस्तर हवामान अंदाज आणि आधुनिक ॲटमॉसफेरिक मॉडेलिंगच्या आधारे विकसित करण्यात आलेली ही प्रणाली संपूर्ण परिसरासाठी १ किमी रिझोल्युशनवर तासागणिक हवेच्या गुणवत्तेचे अंदाज तयार करते. प्रदूषणाच्या पातळीचा दूरदृष्टीपूर्ण आढावा देऊन, ही प्रणाली शहर प्रशासनाला प्रदूषणाच्या घटनांचा अंदाज घेण्यास, वेळेवर उपाययोजना आखण्यास, हवेच्या गुणवत्तेतील नवीन समस्यांचा अभ्यास करण्यास आणि सातत्याने प्रदूषित राहणाऱ्या भागांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. यामुळे अधिक प्रदूषित भाग ओळखणे (पोल्युशन हॉटस्पॉटस्‌‍), विविध उपाययोजनांचे मूल्यांकन करणे तसेच नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रिया अधिक बळकट करण्यास मदत होईल. यामुळे दोन्ही शहरांमध्ये सक्रिय, नियोजनबद्ध आणि डेटा-आधारित हवा गुणवत्ता व्यवस्थापनाला बळ मिळेल. जशी शहरे वाढत जातील आणि हवेच्या गुणवत्तेबाबतचे आव्हान अधिक गुंतागुंतीचे होत जाईल, तसतसे डेटा-आधारित नियोजन आणि सहयोगात्मक कृती अधिक महत्त्वाचे ठरेल. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “स्वच्छ हवा हे केवळ स्वतंत्र उद्दिष्ट नसून शहराचे नियोजन, विकास आणि शाश्वततेचे प्रतिबिंब आहे. तिचा पाणी व्यवस्थापन, हरित क्षेत्र, नागरी पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या जीवनमानाशी जवळचा संबंध आहे. पुणे शहराचा विस्तार आणि विकास होत असताना पर्यावरणीय शाश्वतता आणि विकास यांचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुण्याला अनेक उत्कृष्ट संस्था आणि तज्ज्ञांचे बळ लाभले असून, त्यांच्या सहकार्याने माहिती-आधारित आणि परिणामकारक उपाययोजना विकसित करता येतील. प्रगत हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण प्रणाली, कमी उत्सर्जन क्षेत्रे, हरित क्षेत्राचा विस्तार आणि विविध भागधारकांमधील समन्वयात्मक कृती यांच्या माध्यमातून पुण्याला अधिक निरोगी, स्वच्छ आणि शाश्वत नागरी भविष्य घडविण्याची मोठी संधी आहे.”

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp