
नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्याचे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सिंगल यांच्याकडे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर नांगरे पाटील एसीबीचे अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या धडाडीच्या कार्यपद्धती, कडक प्रशासन आणि जनसामान्यांशी असलेल्या थेट संवादासाठी ओळखले जातात. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी ताज हॉटेलमध्ये आघाडीवर राहून दहशतवाद्यांचा सामना केला होता. या शौर्यासाठी त्यांना “राष्ट्रपती पोलीस पदक’ (शौर्य) देऊन सन्मानित करण्यात आले होते. यापूर्वी त्यांनी मुंबईचे सह-पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), नाशिकचे पोलीस आयुक्त आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते केवळ एक कडक शिस्तीचे अधिकारी म्हणूनच नव्हे, तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो तरुण-तरुणींसाठी मोठे प्रेरणास्थान राहिले आहेत. “मन में है विश्वास’ आणि “कर हर मैदान फत्ते’ या त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी तरुणाईला नेहमीच मार्गदर्शन केले आहे. गुन्हेगारीवर वचक निर्माण करणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि लोकसहभागातून पोलीस दल चालवणे हे त्यांच्या कारकिर्दीचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असल्याने, त्यांच्या अनुभवाचा व कार्यशैलीचा शहरातील कायदा-सुव्यवस्थेला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
