
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांनी विजय मिळवला. कदम यांना ५९३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी देखील २९२ मते मिळवत चुरशीची लढत दिली. त्यांनी महायुतीची सुमारे १०० मतं फोडून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते. त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप ३२५, राष्ट्रवादी (अ. प.) २०५, शिवसेना (शिंदे गट) ११६, राष्ट्रवादी (श. प.) १२०, काँग्रेस ७४, शिवसेना उबाठा १, स्थानिक आघाड्या आणि अपक्ष ५४, असं पक्ष निहाय संख्याबळ होतं. महायुतीच्या मतांचा आकडा ६४६ होता, तर महाविकास आघाडीकडे १९५ मते होती. स्थानिक आघाड्या आणि अपक्षांपैकी बहुतांश मते ही महायुतीच्या गोटातील होती. तरी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची जवळपास १०० मते फोडल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतच संघर्ष झाला होता. त्यानंतर सत्ता स्थापनेवेळी भाजपने नाट्यमय खेळी आणि प्रशासनाला हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेनेला (शिंदे गट) सत्तेपासून रोखले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत मोठा राडा झाला होता. मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. त्या बदल्याच्या भावनेने दोन्ही नेत्यांनी शेवटपर्यंत ताणून धरत भाजपच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना बैठक घ्यावी लागली. मतदानाच्या आदल्या दिवशी शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांचे मन वळविण्यात भाजपला यश आलं. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना महाविकास आघाडीची मते मिळालीच. शिवाय महायुतीच्या नाराज मतदारांना फोडण्यातही त्यांना यश आले. ते ३०० मतांच्या जवळपास पोहोचले. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. एकूण ८९५ पैकी ८९४ इतके मतदान झाले होते. झालेल्या मतदानातील ९ मते अवैध ठरली. उर्वरित ८८५ मतांपैकी महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना पहिल्या पसंतीची ५९३ मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना पहिल्या पसंतीची २९२ मिळाली. धैर्यशील कदम हे ३०१ मतांनी विजयी झाले. मागील निवडणुकीत या मतदार संघातून कॉंग्रेसचे मोहनराव कदम विजयी झाले होते. या निवडणुकीत महायुतीने हा मतदार संघावर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
