
तिवसा शहरातील सातरगाव मार्गावर सुमारे पन्नास वर्षे जुन्या कडुनिंबाच्या झाडाची विनापरवानगी कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे निसर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. हे हिरवेगार कडुनिंबाचे झाड तिवसा नगरपंचायत हद्दीत होते. परिसरातील नागरिकांसाठी ते सावली आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा आधार होते. रात्रीच्या वेळी या झाडाची कत्तल करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली, ज्यामुळे संबंधित यंत्रणेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा नागरिकांचा कयास आहे. महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमानुसार, विनापरवानगी झाडांची कत्तल करणे हा गंभीर गुन्हा आहे. एकीकडे शासन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी विविध मोहिमा राबवत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे जुनी झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी तिवसा नगरपंचायत प्रशासन काय भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे निसर्गप्रेमींचे लक्ष लागले आहे. नगरपंचायत तिवसाचे कार्यालय अधीक्षक डॉ. रोहन राठोड यांनी सांगितले की, “झाड तोडल्याबाबत अद्याप कल्पना नाही. यासंदर्भात स्थळ पाहणी अहवाल तयार केला जाईल. झाड तोडण्यासाठी नगरपंचायतीकडे अर्ज अथवा परवानगी घेतली आहे का, याची पाहणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.” निसर्गप्रेमी अविनाश पांडे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “कोणतेही झाड काही मिनिटांत तोडले जाते, पण पुन्हा उभे राहण्यासाठी अनेक दशके लागतात. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच, त्या ठिकाणी नवीन झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही संबंधितांवर निश्चित करावी.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
