
परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे. मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान संस्थान मंदिरापुढील सभागृहाचे छत आज दुपारी अचानक कोसळले. या भीषण दुर्घटनेत ५० पेक्षा अधिक भाविक छताच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनास्थळी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारच्या गर्दीतच घडली दुर्दैवी घटना यशवाडी देवस्थान येथे दर शनिवारी जिल्हाभरातून आणि शेजारच्या भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. आज शनिवारी देखील सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्य मंदिरासमोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच अचानक दुपारी सभागृहाचे छत पत्त्यांसारखे कोसळले. छत कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि भाविकांमध्ये पळापळ सुरू झाली. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, ५० हून अधिक जण अडकल्याची भीती अचानक छत अंगावर कोसळल्यामुळे ५० पेक्षा जास्त भाविकांना बाहेर पडता आले नाही आणि ते या ढिगाऱ्याखाली अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे आपल्या संपूर्ण पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी अनेक रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) घटनास्थळी पोहोचल्या असून तातडीच्या वैद्यकीय मदतीचे कार्य सुरू आहे. या दुर्घटनेमुळे यशवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून भाविकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे आणि रुग्णालयांकडे धाव घेतली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
