
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी आषाढीवारीच्या तयारीचा आढावा घेतला. विधानभवनात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले, जेणेकरून पालखी सोहळा उत्कृष्ट पद्धतीने पार पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, एकाही वारकऱ्याला असुविधा होऊ नये, यावर त्यांनी भर दिला. या आढावा बैठकीला ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सोलापूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, अपर आयुक्त, सामान्य प्रशासन तुषार ठोंबरे आदी अधिकारी उपस्थित होते. मंत्री गोरे यांनी आषाढीवारीदरम्यान पाणी, शौचालये, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि मुक्कामाची उत्तम व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले. ग्रामविकास विभागाने गतवर्षीपासून पालखी सोहळ्यासाठी निधीची तरतूद सुरू केली असून, यावर्षी ७६ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून निर्माण होणाऱ्या सोयी-सुविधा दर्जेदार असाव्यात, याकडे कटाक्षाने लक्ष देण्यास त्यांनी सांगितले. शौचालयांचा वापर होईल अशा ठिकाणी ती ठेवावीत, तसेच पाण्याची उपलब्धता आणि सतत स्वच्छता राखली जावी, असे गोरे म्हणाले. शौचालयांच्या मार्गावर चिखल होऊ नये यासाठी काँक्रिटीकरण करण्याची कार्यवाही करावी. यावर्षी अतिरिक्त शौचालये ठेवण्यात आल्याने ती किमान ३६ ते ४८ तास आधी पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतील याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर आणि जलरोधक मंडप यांसारख्या व्यवस्था करण्यात आल्या असून, वारकऱ्यांच्या निवाऱ्याची उत्तम सोय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालखीमार्गाला जोडणारे ग्रामीण भागातील रस्ते आणि पालखीतळाकडे जाणारे रस्ते तात्पुरते दुरुस्त न करता कायमस्वरूपी सिमेंटचे करावेत, अशी सूचना गोरे यांनी केली. वारंवार दुरुस्ती करावी लागू नये यासाठी सिमेंट रस्त्यांचे प्रस्ताव पाठवावेत, जेणेकरून पुढील वर्षीच्या पालखीपूर्वी असे रस्ते तयार होतील, असेही त्यांनी नमूद केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
