
हिंगोली जिल्ह्यात सरळ सेवेने भरती झालेल्या ३४ पैकी ३२ केंद्र प्रमुखांना मंगळवारी ता. २३ समुपदेशनाने नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. अवघ्या एक तासात समुपदेशनाची प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यात केंद्रप्रमुख मिळाल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण हलका होणार आहे. या शिवाय गुणवत्तेवरही परिणाम होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात सुमारे १ हजार प्राथमिक शाळांसाठी ६८ केंद्र आहेत. त्यापैकी केवळ ३४ केंद्र प्रमुखांच्याच जागा भरण्यात आल्या होत्या. उर्वरीत जागा सरळसेवेने भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मागील आठ ते दहा वर्षापासू हि पदे रिक्त असल्याने त्या त्या केंद्रातील जेष्ठ शिक्षकाला या पदाचा पदभार देण्यात आला होता. तर या केंद्रप्रमुखांना टपाली कामेच जास्त करावी लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नव्हता. त्याचा परिणाम शाळेच्या गुणवत्तेवर होऊ लागला होता. राज्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी विविध शिक्षक संघटनांच्या वतीने केली जात होती. त्यानंतर शासनाने परिक्षा घेऊन त्यातून गुणानुक्रमे केंद्र प्रमुखांची यादी तयार करून प्रत्येक जिल्हा परिषदेला पाठवली होती. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात ३४ केंद्र प्रमुखांच्या याद्या प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान, आज जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचारी विजय बांगर उपस्थितीत आज समुपदेशनाची प्रक्रिया पार पडली. अवघ्या एक तासात हि संपूर्ण प्रक्रिया पार पडली असून केंद्र प्रमुखांना त्यांच्या केंद्रावरील नियुक्ती आदेश देखील देण्यात आले आहेत. जिल्ह्यात उशीरा का होईना केंद्र प्रमुखांची नियुक्ती झाल्यामुळे आता शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण हलका झाला आहे. या शिवाय गुणवत्ता वाढीस मदत मिळणार आहे. नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर केंद्रप्रमुखांनी समाधान व्यक्त केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
