
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होऊन राज्याच्या काही भागांत पाऊस पडला असला तरी, त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली होती. जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. मात्र आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून सोमवारी अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सकारात्मक वातावरणातच भारतीय हवामान विभागाने आपला नवा अंदाज वर्तवला असून, त्यानुसार पुढील 48 तासांत संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी असून, अखेर मराठवाड्यासह कोकण किनारपट्टी आणि पुण्यात मान्सून दाखल झाला आहे. काही काळ कोकणात रेंगाळलेला मान्सून आता वेगाने पुढे सरकला असून, तो पुण्यात आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे. मान्सूनच्या या समाधानकारक आगमनामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची चिंता दूर झाली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील 10 दिवस हे मान्सूनच्या उर्वरित वाटचालीसाठी अतिशय अनुकूल असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेषतः आगामी 48 तास हे मान्सूनच्या सक्रियतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, या काळात धाराशिव, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांसह कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भाला आणखी 3-4 दिवसांची प्रतीक्षा एकीकडे आज नाशिक, नागपूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, दुसरीकडे विदर्भाला मात्र मान्सूनसाठी आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्यातरी विदर्भातील काही भागांत ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर चार ते पाच दिवसांनी संपूर्ण विदर्भात दमदार पावसाची अपेक्षा आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
