
धारणी तालुक्यातील सुसर्दा येथील शासकीय आदिवासी आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणाऱ्या नवीन सत्रासाठी ही ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही संस्था केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा म्हणून कार्यरत आहे. ‘यावे प्रशिक्षणासाठी – निघावे स्वयंरोजगारासाठी’ या ब्रीदवाक्याला अनुसरून, विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक व बिगर-तांत्रिक व्यवसायांमध्ये दर्जेदार प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार आणि नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे हा या संस्थेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगाराभिमुख तांत्रिक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेत इंजिनिअरिंग अंतर्गत दोन वर्षांचे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘फिटर’ (२० जागा) आणि ‘यांत्रिक मोटार गाडी – मेकॅनिक मोटर व्हेईकल’ (२४ जागा) हे अभ्यासक्रम मुले व मुली दोघांसाठी खुले आहेत. याव्यतिरिक्त, आठवी किंवा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा ‘वेल्डर’ कोर्स (२० जागा) उपलब्ध आहे. मुलींसाठी विशेष असलेला एक वर्षाचा ‘स्युवींग टेक्नॉलॉजी’ हा नॉन-इंजिनिअरिंग कोर्स (२० जागा) देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व व्यवसायांसाठी ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी शासनाच्या http://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
