
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहात रविवारी सायंकाळी ‘जरा जम के बरसो’ या सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीत ‘साहस वैदर्भी’ आणि ‘मैत्र जीवांचे’ या संस्थांनी पाऊसगाण्यांचा सुरेल नजराणा सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. सभागृह श्रोत्यांनी भरले होते. आशुतोष देशपांडे, शीतल भट, केतकी मोहदरकर-देशपांडे आणि आदित्य खारोकर या गायकांनी मराठी आणि हिंदीतील नवी-जुनी पाऊसगाणी सादर केली. यामध्ये ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘नभ उतरू आलं’, ‘मी डोलकर दर्याचा राजा’, ‘भिजून गेला वारा’, ‘मेघा रे मेघा रे’, ‘ये रात भीगी भीगी’, ‘रिमझिम गिरे सावन’ आणि ‘ओ साजना बरखा बहार आयी’ यांसारख्या लोकप्रिय गीतांचा समावेश होता. १९५६ साली प्रदर्शित झालेल्या ‘चोरी चोरी’ चित्रपटातील ‘ये रात भीगी भीगी’ पासून ते अलीकडच्या ‘भिजून गेला वारा’ पर्यंतच्या ७० वर्षांतील गाण्यांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले. गायकांच्या समर्थ गायकीला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत आणि ‘वन्स मोअर’चा आग्रह धरत दाद दिली. सुमारे अडीच तास चाललेल्या या सांगीतिक सोहळ्याचा श्रोत्यांनी मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाची सांगता ‘मदर इंडिया’ चित्रपटातील ‘दुःख भरे दिन बिते रे भय्या’ या गाण्याने झाली. लोकप्रिय निवेदक नितीन भट यांचे सुश्राव्य निवेदन कार्यक्रमाची एक जमेची बाजू ठरली. या मैफिलीत रामेश्वर काळे (सिंथसायझर), विशाल पांडे (तबला), मनीष आत्राम (ढोलक), वीरेंद्र गावंडे (ऑक्टोपॅड), जानराव देहाळे (बासरी) आणि अभिजित भावे (गिटार) यांनी सुरेल साथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. हेमंत थेटे यांनी प्रास्ताविकातून आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सूरमणी डॉ. कमलताई भोंडे, मुरलीधर भोंडे, सुनील सरोदे, अमित कोल्हटकर, चिन्मय जोशी, केदार जोशी, अंजली थेटे, प्रवीण चापोरकर, सुनील सरोदे, प्रवीण केवले, अविनाश शुक्ल, उदय पर्वतकर, दीपक जोशी, सुबोध क्षीरसागर, अविनाश मोहरील, पद्मश्री देशपांडे, प्रशांत बखले, स्मिता जोशी, अपर्णा काटे, अनंत जोशी, संजय जोशी यांचे आयोजनासाठी पाठबळ लाभले. प्रकाश आणि ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी गोपाल बंग यांनी सांभाळली, तर दृकश्राव्य आणि प्रसारणात संस्कृती स्टुडिओच्या सचिन वाठोडकर यांनी सहकार्य केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
