
पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील व्यावसायिक केतन अग्रवाल (वय 26) याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटलेली ही घटना पूर्वनियोजित हत्या असल्याचे तपासात समोर आले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच मित्रांच्या मदतीने त्याचा खून केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत केतन अग्रवाल हा गहुंजे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता आणि तो स्वतः एका रिअल इस्टेट कंपनीत संचालक होता. त्याचे लग्न मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी ठरले होते. नोव्हेंबरमध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे 14 कोटी रुपये खर्चून भव्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यासाठी दोन विमानेही बुक करण्यात आली होती. 18 जून 2026 रोजी सियाच्या वाढदिवसानिमित्त केतन, सिया आणि तिचे मित्र लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. तेथे फोटो काढताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तोल जाऊन केतन 400 फूट खोल दरीत पडल्याचा बनाव सिया आणि तिच्या साथीदारांनी रचला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ‘शिवदुर्ग मित्र’ पथकाने केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढला होता. सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि संशयितांची कसून चौकशी केली. या तपासात सिया गोयलला केतनसोबत लग्न करायचे नव्हते हे स्पष्ट झाले. हा विवाह मान्य नसल्याने तिने केतनला कायमचे संपवण्याचा कट रचला. नियोजित कटानुसार, तिने केतनला फोटो काढण्याच्या बहाण्याने किल्ल्याच्या धोकादायक कड्यावर नेले आणि संधी मिळताच मित्रांच्या मदतीने त्याला दरीत ढकलून दिले. या हाय-प्रोफाइल हत्येच्या उलगड्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
