
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून तब्बल २८ लाख ५० हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागांतर्गत विविध कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये वरुड (कोल्हेखिंड), स्वरूपखानवाडी (मक्याचा दरा), उंबर्डे (खोत वस्ती) आणि तोंडले (सत्रे वस्ती) ता. माण येथील पाझर तलाव तसेच ग्राम तलाव दुरुस्तीची कामे समाविष्ट होती. या कामांसाठी एल-१ अर्थात न्यूनतम दर देणारे ठेकेदार म्हणून निवड झाल्यानंतर शासनाकडे जमा करावयाची सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव प्रत्यक्षात न भरता बँकेचा बनावट ‘रिसिव्हड’ शिक्का, खोटा डेटर आणि कॅशियरची बनावट सही वापरून चलने तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. यातील आरोपी योगेश रवींद्र बर्गे (रा. शिंदेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) याने १५ मे २०२६ रोजी १४ लाख २३ हजार ५०० रुपये भरल्याचे बनावट चलन सादर केले. तर विजय बापूसाहेब घाडगे (रा. विक्रांतनगर, संभाजीनगर एमआयडीसी, सातारा) याने १८ मे २०२६ रोजी १४ लाख २७ हजार ४५० रुपये भरल्याचे चलन सादर केल्याचे समोर आले आहे. या दोघांनी मिळून एकूण २८ लाख ५० हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. हा प्रकार १५ आणि १८ मे रोजी जिल्हा परिषद कार्यालयात घडल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी कर्मचारी अरुणकुमार शंभू दिलपाक (वय ५८, रा. सत्यम सोसायटी, सदरबझार, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटोळे पुढील तपास करीत आहेत. धनगरवाडीतील १९ वर्षीय युवक बेपत्ता सातारा तालुक्यातील धनगरवाडी येथील १९ वर्षीय युवक अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. युवकाचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांसह पोलिस यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन अम्रेश बाकले (वय १९, रा. धनगरवाडी, ता. जि. सातारा) हा दि. १४ रोजी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरातून कोणालाही कोणतीही माहिती न देता बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांकडे शोध घेतला. मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर चेतनची आई शांता अम्रेश बाकले (वय ३५) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून युवक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून महिला पोलिस हवालदार पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. युवकाबाबत कोणाला माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉजिंगमध्ये अश्लील कृत्यप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा सातारा शहरातील शाहूनगर परिसरातील सावंत कॉलनी येथे असलेल्या शिवनेरी स्नॅक्स सेंटर व लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित लॉजिंगमध्ये काही व्यक्ती अश्लील कृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान स्नॅक्स सेंटर चालकाने अशा कृत्यासाठी अपप्रेरणा दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रियांका गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सचिन अर्जुन पुडेकर (वय २२, सध्या रा. अहिरे कॉलनी, अमरलक्ष्मी, सातारा; मूळ रा. दातेवाडी, ता. खटाव), श्रेयश संतोष जगताप (वय १९, रा. वडगाव, ता. फलटण) तसेच एका १९ वर्षीय युवतीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित युवतीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ताटे करीत आहेत. आजारपणाला कंटाळून युवकाची आत्महत्या साताऱ्यात एका २६ वर्षीय युवकाने आजारपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत उत्तम कणसे (वय २६, मूळ रा. खटाव, जि. सातारा, सध्या रा. कोडोली, ता. जि. सातारा) हा युवक काही काळापासून आजारी होता. दीर्घकाळ सुरू असलेल्या आजारामुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त होता. दि. २१ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक गावडे यांनी बीडी क्रमांक २४२/२०२६ अन्वये तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या संदर्भात डॉ. प्रतिक गावडे यांनी पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक तपास पोलीस हवालदार पाटोळे यांनी केला असून पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत. कृष्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू; महागाव परिसरात हळहळ सातारा तालुक्यातील महागाव हद्दीतील कृष्णा नदीपात्रात पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव अंकुश कांबळे यांचा दि. २२ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीच्या पात्रात पडून बुडाल्याने मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत महागावचे पोलीस पाटील शिवाजी सर्जेराव चव्हाण (वय ५७) यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूमागील परिस्थिती, अपघाताचे नेमके कारण तसेच इतर बाबींची चौकशी सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार भोंडवे करीत आहेत. युवकाच्या अकाली निधनामुळे महागाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
