2029 साठी ‘शतप्रतिशत’ची तयारी?: 2024 लोकसभेच्या फटक्यानंतर भाजपचा ‘मास्टरप्लॅन’; मित्रपक्षांच्याच गडात उभारली समांतर सत्ताकेंद्रे! – Chhatrapati Sambhajinagar News

2029 साठी ‘शतप्रतिशत’ची तयारी?:  2024 लोकसभेच्या फटक्यानंतर भाजपचा ‘मास्टरप्लॅन’; मित्रपक्षांच्याच गडात उभारली समांतर सत्ताकेंद्रे! – Chhatrapati Sambhajinagar News



राज्यात ‘महायुती’चे सरकार वरकरणी कितीही मजबूत दिसत असले आणि ‘ऑल इज वेल’चे दावे केले जात असले, तरी पडद्यामागे भारतीय जनता पक्षाने थेट 2029 च्या विधानसभा आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकांची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयका’नंतर राज्याचे राजकीय चित्र बदलणार आहे. हेच ओळखून भविष्यात प्रादेशिक मित्रपक्षांवर (शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट) विसंबून न राहता ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा सत्यात उतरवण्यासाठी भाजपने मित्रपक्षांच्याच बालेकिल्ल्यांमध्ये अत्यंत आक्रमक आणि छूपी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद आणि निधी वाटपाच्या माध्यमातून मित्रपक्षांचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांना मोठी राजकीय ‘रसद’ पुरवून समांतर सत्ताकेंद्रे उभी केली जात आहेत. भाजपच्या या आक्रमक ‘विस्तारवादा’मुळे सध्या महायुतीत मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे. भाजपच्या या छुप्या रणनीतीमागील 5 प्रमुख कारणे 1. 2024 च्या लोकसभा निकालांचा फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसला (पक्ष अवघ्या 9 जागांवर आला). मित्रपक्षांची (विशेषतः अजित पवार गटाची) मते भाजपला अपेक्षेप्रमाणे ट्रान्सफर झाली नाहीत. त्यामुळे भविष्यात दुसऱ्याच्या मतांवर अवलंबून न राहता स्वबळ वाढवणे, हा या रणनीतीमागचा मुख्य उद्देश आहे. 2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) इशारा काही दिवसांपूर्वीच संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मधून अजित पवारांसोबत केलेल्या युतीवर कडाडून टीका करण्यात आली होती. “अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपच्या मूळ मतदारांमध्ये नाराजी पसरली,” असा थेट ठपका संघाने ठेवल्याने, भाजप आता मित्रपक्षांपासून स्थानिक पातळीवर ‘सेफ डिस्टन्स’ ठेवत आहे. 3. विधानसभा जागावाटपाचे ‘दबावतंत्र’ आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला किमान 150+ जागा लढवायच्या आहेत. आतापासूनच मित्रपक्षांच्या मतदारसंघात स्वतःचे प्रबळ उमेदवार उभे केल्यास, जागावाटपाच्या वेळी (Seat Sharing) “आमचा उमेदवार अधिक सक्षम आहे” असा दावा करून मित्रपक्षांच्या जागा स्वतःकडे खेचून घेता येतील. 4. आमदारांच्या ‘घरवापसी’ची भीती (प्लॅन बी) लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ असून, ते पुन्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. आपले मित्रपक्ष जर उद्या फुटले किंवा कमकुवत झाले, तर तिथे भाजपची ताकद ‘स्टँडबाय’ (Standby) असावी, यासाठी ही मोर्चेबांधणी सुरू आहे. 5. मराठा विरुद्ध ओबीसी (सोशल इंजिनिअरिंग) मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज महायुतीपासून दुरावला आहे. अशा वेळी मित्रपक्षांवर विसंबून न राहता, स्थानिक पातळीवर भाजप स्वतःची नवी ‘सोशल इंजिनिअरिंग’ करत ओबीसींची मोट बांधत आहे. मित्रपक्षांच्या बालेकिल्ल्यात कशी पुरवली जातेय ‘रसद’? भाजपच्या चाणक्यांनी प्रत्येक मतदारसंघात सूक्ष्म नियोजन सुरू केले असून, अनेक ठिकाणी पर्यायी उमेदवार उभे केले आहेत: छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच खिंडार या रणनीतीचा सर्वाधिक फटका संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेला बसला आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे 1 खासदार, 6 आमदार आणि पालकमंत्री असूनही, स्वराज्य संस्थांच्या सत्तावाटपातून भाजपने शिवसेनेला अक्षरशः बाजूला सारले आहे. वैजापूर: शिवसेनेचे रमेश बोरणारे आमदार असताना भाजपने अविनाश गलांडे यांना जि.प. अध्यक्षपद दिले, तर नगराध्यक्षपदही भाजपकडेच आहे. संभाजीनगर मध्य: शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आमदार असताना भाजपने समीर राजूरकर (महापौर) आणि अनिल मकरिये (स्थायी समिती अध्यक्ष) यांना पदे देऊन शिवसेनेला शह दिला. कन्नड व सिल्लोड: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये आणि कन्नडमध्ये भाजपने जि.प. सभापतीपदे आपल्याकडे घेतली. ‘सोयगाव पंचायत समिती’त 18 पैकी 10 जागा जिंकत भाजपने सत्तारांना त्यांच्याच होमपीचवर मोठा धक्का दिला. मित्रपक्षांतील संभाव्य आमदारांचे ‘मॅपिंग’ पूर्ण- चोरमारे राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणाले की, 2029 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता आणण्याचे घोषणा भाजपने यापूर्वीच केली आहे. त्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर होईल. कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो, भाजपला कसे यश मिळते यावर ते सर्व अवलंबून असतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व काही ताब्यात घेणाऱ्या भाजपला आता लोकसभेची चिंता राहिलेली नाही. विजय चोरमारे म्हणाले की, 2029 मध्ये त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायची आहे, त्या दृष्टीने पावले उचलण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. ज्या मतदारसंघात ते कमकुवत आहेत ते हेरत तिथे निवडून येण्याची क्षमता असणारे लोकं कोण आहेत त्यांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. मित्र पक्षातील कोण जिंकू शकते ते अजित पवारांच्या पक्षातील आहे की एकनाथ शिंदेंच्या पक्षातील कोण असू शकते, मित्र पक्षातील कोणते आमदार आपल्याकडे घ्यायचे हे सुद्धा त्यांचे जवळपास निश्चित झाले आहे. यावर निर्णय लगेच होईल असे नाही. निवडणुकीच्या तोंडावर हे मित्र पक्षातील आमदार यांना सोबत घेत 145 च्या संख्याबळाचा आकडा मिळवायचा त्यांची मोहीम सुरू झाली आहे. विधान परिषदेत सुद्धा बहुमत मिळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. आघाडी असली तरी कोणी कोणासाठी ‘त्याग’ करत नाही-दीक्षित राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित म्हणाले की, कुठलाही राजकीय पक्ष कायम आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो आघाडीत असो किंवा मित्रपक्ष असले तरी. युती-आघाडीमध्ये काही सीमा ठरवलेली नसते. भाजपचे नेतृ्त्व हे महत्तकांक्षी आहेत. जर एखाद्या भागात मित्र पक्षाचा नेता कमी पडला तर भाजपच्या नेत्याला बळ देण्याचा प्रयत्न करतो आणि वाटाघाटीमध्ये तो मतदारसंघ आपल्याकडे घेतो. तसे नसेल तर त्या मतदारसंघातील विद्यमान नेता आपल्या कयात रहावा यासाठी तसे सत्ताकेंद्र तयार केले जातात. हे काही भाजपच करते असे नाही यापूर्वी काँग्रेस सुद्धा असेच करत होते. आघाडी-युती असली म्हणून मित्रपक्ष मोठा व्हावा म्हणून कोणी त्याग करत नाही.
प्रशांत दीक्षित म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी समोरच्याला अकुंश लावू शकेल असा माणूस तयार करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा असे शकतो. भाजपला शतप्रतिशत भाजप करायचे आहे त्याचच हा भाग आहे यामध्ये काही दुमत नाहीच. पण तसे नाही झाले तरी त्या त्या मतदारसंघात आपला वजनदार नेता असावे असे त्या मागे नियोजन असते. मतदारसंघ हातात आला तर चांगलेच आहे नाही तर तिथल्या नेत्यावर अकुंश ठेवण्याचे काम पक्षाकडून करण्यात येत असते. ही रस्सीखेच सर्वच पक्षात सुरू असते. भाजपला आपले वर्चस्व वाढवायचे आहे. ते 160 पर्यंत जाण्याची धडपड करणारच आहेत. त्यामध्ये जे मतदारसंघ आपल्याला सोपे होऊ शकतात, मित्र पक्षाचे आमदार-खासदार कमकुवत आहेत तिथे पुढील 3 वर्षांमध्ये आपले नेतृत्व उभे करायचे मग वाटाघाटीच्या वेळेस तो मतदारसंघ आपल्याकडे घ्यायचा किंवा तिथे पराभव होईल हे बघायचे. पराभव होईल यापेक्षा मतदारसंघ आपल्याकडे कसा येईल याकडे लक्ष दिले जाते. कारण काटाकाटीमध्ये सत्ताच हातून जावू शकते. प्रशांत दीक्षित म्हणाले की, आता जरी उमेदवार तयार केले पण भाजपच्या लक्षात आले की हवा आपल्याला हवी तशी नाही आपण अडचणीत येऊ शकतो तर ते मित्रपक्षांना धक्का देत नाही. त्यांना जर वाटले की पूर्ण वातावरण आपल्या बाजूने आहे पूर्ण बहुमताने सरकार येऊ शकते तरच ते निर्णय घेऊ शकतील. 2029 च्या विधानसभा निवडणुकीतील लोकसभा हा एक टप्पा आहे. आपले सरकार आणायचे तर आतापासून जी तयारी सुरू आहे ती विधानसभेसाठीच सुरू आहे. विधानसभेकडे लक्ष देत काम सुरू केले जाईल त्यासाठी काम केले तर लोकसभा सोपी जाईल, असे सध्याच्या राजकारणात सुरू आहे असे वाटते. उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ‘क्रेडिट वॉर’ ग्रामीण भागासोबतच भाजप नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हक्काच्या बालेकिल्ल्यातही (ठाणे-नवी मुंबई) डोकेदुखी वाढवली आहे. नवी मुंबईत स्वतः उपमुख्यमंत्री असलेल्या एका कार्यक्रमात त्यांनाच निमंत्रण न दिल्याने खळबळ उडाली होती. डोंबिवलीत मोठागाव रेल्वे उड्डाणपुलावरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक आमदार राजेश मोरे आणि भाजपचे दीपेश म्हात्रे यांच्यात उघडपणे श्रेय घेण्याची लढाई (क्रेडिट वॉर) भडकली आहे. आम्ही संघटना वाढवण्यात सर्वात पुढे- शितोळे भाजप छत्रपती संभाजीनगरचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे म्हणाले की, गेल्या 10 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नव्हत्या. या काळात भाजपने इतर पक्षांपेक्षा संघटनेची बांधणी केली आहे. अनेक मोठे प्रकल्प राबवत कार्यकर्त्यांना सतत सक्रिय ठेवले असून वेगवेगळे कार्यक्रम घेत पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले आहे. यामुळे पक्ष संघटनेची ताकदच इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की प्रत्येक ठिकाणी सक्षम कार्यकर्ते, कार्यकर्त्यांचे जाळं निर्माण झाले आहे. यातच मतदारांचा ओढा भाजपकडे आहे, अशा वेळेला निवडणुका जिंकणे आणि पदे मिळणं हे क्रमप्राप्त आहे. याचा अर्थ असा नाही की आम्हाला मित्रपक्षांना शह द्यायचा आहे. यात काही राजकारण नाही, ते सुद्धा त्यांचे पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, आम्ही त्यामध्ये सर्वांत पुढे आहोत हे सर्व जण मान्य करतील.
पण मित्रपक्षांना शह देण्याचा कोणताही हेतू नाही किशोर शितोळे म्हणाले की, विधान परिषदेच्या जागेसंदर्भात जर विचार करायचा झाला तर ज्यांचे संख्याबळ जास्त आहेत त्यांचा उमेदवार. छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर आमच्याकडे सर्वाधिक 270 पेक्षा जास्त मतदान होते. भाजपचे मतदार असल्याने ही जागा भाजपने मागीतली. जिथे शिवसेनेच संख्याबळ जास्त होते त्या ठिकाणी शिवसेनेना जागा सोडण्यात आली. संख्याबळ असल्यावर पद येत असतात. जनमताचा कौल तुमच्याकडे कधी ज्यावेळी तुम्ही दररोज जनतेमध्ये असतात, त्यांची कामे करतात. हे प्रत्येकाला करता येऊ शकते, हे काही गुप्त काम नाही. सर्व पक्ष आपआपल्या पद्धतीने ताकद लावण्याचे काम करत असतात, त्यामध्ये आमची ताकद थोडी जास्त आहे. माझा पक्ष मोठा असला पाहिजे, शहरातही मी मोठा असलो पाहिजे.प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असते की माझा पक्ष मोठा असावा. त्यामुळे प्रत्येक जण धडपड करतो आहे. उद्या काय होईल सांगता येत नाही. आम्ही झोकून देत पक्षबांधणी करणे आणि जनतेमध्ये जाण्यासाठी तत्पर आहोत. इतर मतदारसंघांतील ‘रसद’ आणि घुसखोरी: अहमदनगर (कोपरगाव): राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आमदार असताना भाजपने त्यांचे कट्टर विरोधक विवेक कोल्हे यांना विधान परिषदेच्या माध्यमातून बळ दिले. हिंगोली (कळमनुरी): शिवसेनेचे आक्रमक आमदार संतोष बांगर यांच्या कोंडीसाठी भाजपने प्रज्ञा राजीव सातव यांना पक्षात घेऊन विधान परिषदेची संधी दिली. जालना: शिवसेनेची हक्काची (छत्रपती संभाजीनगर-जालना) विधान परिषदेची जागा भाजपने स्वतःकडे खेचली. तसेच, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना भाजपमध्ये घेऊन ताकद दिली जात आहे. कोल्हापूर (कागल) आणि बीड: मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात समरजित घाटगे यांना पुन्हा भाजपमध्ये घेऊन रसद पुरवली जात आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या मतदारसंघात भाजपच्या लक्ष्मण पवार यांच्या पत्नीला नगराध्यक्ष करून समांतर तयारी सुरू आहे. पुणे (भोर) आणि सिंधुदुर्ग: राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर असलेल्या भोरमध्ये संग्राम थोपटे यांना भाजपत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर सिंधुदुर्गात मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी नगरपालिकेत भाजपने सत्ता काबीज केली आहे. मित्रपक्षांची नाराजी चव्हाट्यावर; ‘महायुतीत स्फोटाचे संकेत?’ भाजपच्या या वाढत्या विस्तारवादामुळे आणि हस्तक्षेपाची पद्धत पाहून मित्रपक्षांच्या नेत्यांचा संताप आता उघडपणे बाहेर येऊ लागला आहे.
अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड: शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्विग्न होऊन म्हटले होते की, “मित्रपक्ष आमचे मुंडकं उडवण्याचे काम करत आहे. आमचा त्याग भाजप विसरला आहे.” याला दुजोरा देत आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “सत्तारांची व्यथा खरी आहे. माझ्या मतदारसंघातही असाच हस्तक्षेप सुरू आहे. एकमेकांचे असे खच्चीकरण करणे हिताचे नाही.” शंभूराज देसाई: शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनाही त्यांच्या जिल्ह्यात विधान परिषद आणि जि.प. निवडणुकांच्या वेळी कोंडीत पकडण्यात आले. संतापलेल्या देसाईंनी खंत व्यक्त केली की, “निवडणुकांच्या बैठकीचे आम्हाला निमंत्रणच नसेल, तर आम्ही कोणत्या गाडीत बसायचे? महायुतीत आमची अवस्था वाईट झाली आहे.” 1990 मध्ये युतीमध्ये ‘धाकटा भाऊ’ असलेला भाजप आता पूर्णपणे ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेत आला आहे. आगामी काळात भाजपचा हा आक्रमक ‘विस्तारवाद’ आणि दबावतंत्र महायुतीत मोठी दरी निर्माण करण्याची आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय स्फोट घडवून आणण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp