
राज्यातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून रस्ते विकासाबरोबरच रस्ते सुरक्षा हा प्रत्येक प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे. राज्यातील अपघातप्रवण मार्गांवर आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोज
.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी ही माहिती दिली.
मंत्री भोसले म्हणाले की, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पोलादपूर–महाबळेश्वर मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा पर्यटन व दळणवळण मार्ग आहे. या मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण सातत्याने वाढत असून रस्त्याची क्षमता वाढविणे आणि सुरक्षा उपाययोजना बळकट करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाकडून विविध टप्प्यांमध्ये कामे हाती घेण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते कुंभरोशी (प्रतापगड पायथा) या राज्य महामार्ग क्रमांक १३१ वरील सुमारे २४.२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणा व रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) मार्फत हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल (HAM) अंतर्गत प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पात विद्यमान रस्त्याचे रुंदीकरण, मजबूत डांबरीकरण, वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा आणि आधुनिक तांत्रिक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत सुमारे १४ किलोमीटर लांबीच्या विद्यमान ५.५० मीटर रुंदीच्या रस्त्याचे ७ मीटर रुंदीपर्यंत डांबरीकरण करण्यात येत आहे. तसेच दोन्ही बाजूंना १.५० मीटर रुंदीचे खांदे विकसित केले जात आहेत. याशिवाय उर्वरित सुमारे १० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचेही रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येत आहे. कुंभरोशी ते महाबळेश्वर या मार्गावरील सुमारे १६.३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची कामेही लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
आंबेनळी घाट हा तीव्र उतार, अवघड वळणे आणि खोल दऱ्यांमुळे संवेदनशील घाटमार्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. घाटातील धोकादायक ठिकाणी अँटी-क्रॅश बॅरिअर्स, मजबूत सुरक्षा कठडे, संरक्षक भिंती, रिफ्लेक्टर, कॅट-आयज, परावर्तित दिशादर्शक फलक आणि सूचना फलक बसविण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि धुक्याच्या वातावरणात वाहनचालकांना मार्ग स्पष्टपणे दिसण्यास मदत होणार आहे.
मंत्री भोसले यांनी सांगितले की, २४ मे २०२६ रोजी आंबेनळी घाटात घडलेला अपघात हा वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अपघातस्थळी रस्त्याची रुंदी सुमारे १४ मीटर असून तेथे सुरक्षा कठडे, अँटी-क्रॅश बॅरिअर्स आणि दिशादर्शक फलक उपलब्ध होते. या घटनेची नोंद पोलिस पंचनाम्यात करण्यात आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांप्रती शासनाने संवेदना व्यक्त केल्या असून मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहितीही मंत्री भोसले यांनी दिली.
राज्यातील सर्व अपघातप्रवण घाटरस्ते आणि प्रमुख मार्गांचा स्वतंत्र आढावा घेण्यात येत असून रस्ते सुरक्षा लेखापरीक्षण (Road Safety Audit) करण्यावर भर दिला जात आहे. ज्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनांची आवश्यकता आहे तेथे तातडीने कामे हाती घेण्यात येणार आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्ता चिन्हांकन, वेगमर्यादा दर्शक फलक, चेतावणी फलक आणि प्रकाशयोजना यावरही विशेष भर दिला जात आहे.
“रस्ते विकासाची कामे करताना केवळ वाहतुकीची क्षमता वाढविणे हे उद्दिष्ट नसून नागरिकांचा जीवितहानीपासून बचाव करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्यातील प्रत्येक रस्ता अधिक सुरक्षित, आधुनिक आणि विश्वासार्ह करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
