
यावर्षी जवळपास 20 दिवस उशिरा आलेल्या मान्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्रात दमदार एंट्री केली आहे. प्रशांत महासागरातील ‘अल निनो’च्या प्रभावामुळे रेंगाळलेला मान्सून आता राज्यभरात सक्रिय झाला असून, पुढील 48 तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 27 जुलैपर्यंत राज्यासाठी महत्त्वाचे इशारे जारी केले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून २३ जून रोजी मुंबईसह महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिशामध्ये पुढे सरकला आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय पश्चिमेकडील वारे सुमारे 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत मजबूत झाले असून उत्तर सोमालिया किनारपट्टीलगत कमी दाबाचा ‘जेट प्रवाह’ सक्रिय झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात आणि छत्तीसगड-मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागांत धडकण्याची शक्यता आहे. राज्यात कुठे कसा असणार पाऊस? कोकण आणि मध्य महाराष्ट्र: उत्तर कोकणात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि वादळी वारे: मराठवाड्यातील काही भागांत अतिजोरदार पाऊस पडेल. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासाठी यलो अलर्ट; धरणक्षेत्रातही जोर वाढणार पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खडकवासला आणि इतर धरणसाखळी क्षेत्रांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. बुधवारी ढगाळ वातावरण राहिल्यानंतर आता पुढील तीन दिवस पुण्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पूरस्थिती राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड आणि सोयगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून, एक तरुण पुरात वाहून गेल्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर आणि मुक्ताईनगर भागात पूरस्थिती निर्माण झाली. जळगाव शहरातील वाल्मीक नगर परिसरातील एका शाळेत आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. अमरावती शहरात अवघ्या दीड तासात तब्बल ९१.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. मुंबई आणि कोकणात दिलासा; शेतीच्या कामांना वेग मुंबईसह वसई-विरार आणि नालासोपारा भागात कालच्या मुसळधार पावसानंतर आज काहीसा दिलासा मिळाला आहे. पाणी ओसरले असून पश्चिम रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे. मात्र, दिवसभरात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोकणात पावसामुळे भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, काही ठिकाणी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना नदीतील पाण्याचा उपसा करून चिखलण करावे लागत आहे. उशिरा आलेल्या मान्सूनने आता संपूर्ण राज्य व्यापले असून, शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, आगामी काळात अतिवृष्टीचा इशारा असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
