
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद अमरावतीत उमटले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. बुधवारी झालेल्या या आंदोलनादरम्यान प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील घटनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या शेवटी, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला पाठवण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की, लाठीहल्ला करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि जखमी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, दिल्लीत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांद्वारे लाठीचार्ज केला. ही घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारी आहे. या लाठीहल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू आणि शहराध्यक्ष बंटी रामटेके यांनी केले. यावेळी प्रवक्ते जीतू दुधाने, संपर्कप्रमुख गोलूभाऊ पाटील, हॉकर्स युनियनचे शहराध्यक्ष गणेश मारोडकर, संघटक श्यामभाऊ इंगळे, जिल्हा महासचिव शेख अकबरभाई, युवक आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत देशमुख, तसेच दिनेश कुऱ्हेकर, नीलेश पानसे, विक्रम शेगोकार, नीलेश लंगोटे, प्रशांत शिरभाते, इमरानभाई, विक्रम जाधव, शेषराव धुळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/