
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनी गोवऱ्या बनवण्याचे अभिनव यंत्र तयार केले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंटही मिळाले आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील एका महत्त्वाच्या कामाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. या संशोधनाचे नाव “गाईच्या शेणापासून गोवरी उत्पादनास्तव आयओटी बेस मशीन निर्मिती” असे आहे. भारत सरकारच्या डिझाइन्स अधिनियम, २००० अंतर्गत पेटंट विभागाच्या औद्योगिक रचना विभागात याची नोंद झाली आहे. ही मान्यता प्रा. भारसाकळे यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाची, तांत्रिक उत्कृष्टतेची आणि ग्रामीण विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची अधिकृत दखल आहे. प्रा. भारसाकळे यांना यापूर्वीही भारत सरकारकडून एकाच वेळी तीन कॉपीराइट्स मिळाले आहेत. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, जैवऊर्जा आणि टाकाऊ वस्तूंपासून मूल्यनिर्मिती (वेस्ट टू वेल्थ) या संकल्पनेवर आधारित गायीच्या शेणापासून रांगोळी व खडू निर्मितीच्या त्यांच्या संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली आहे. तीन कॉपीराइट्स आणि डिझाइन पेटंट (रजिस्टर डिझाइन) अशी दुहेरी मान्यता मिळवणे ही एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रेरणादायी कामगिरी मानली जाते. हे संशोधन शेतकरी जीवन समृद्ध करणारे आणि गोसेवापूरक असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागासह महाराष्ट्र गोसेवा आयोगाने याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे. उन्नत भारत अभियान अंतर्गतही ही सेवा येत असल्याने या अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे मार्गदर्शन या मशीन निर्मितीसाठी लाभले, असे प्रा. भारसाकळे यांनी सांगितले. या यंत्राला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हॅकेथॉन स्पर्धेतही पुरस्कार मिळाला आहे. आता ‘डंक्स ॲन्ड हर्बस् प्रा.लि.’ या कंपनीद्वारे स्टार्टअप फंडासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. प्रा. गजानन भारसाकळे हे शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. गजानन भारसाकळे यांची इतरही अनेक क्षेत्रांत ओळख आहे. ते शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाभुळगाव येथील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांना यापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे समाजकार्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. दर्यापूर तालुक्यातील आई महोत्सवाचे जनक म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. याव्यतिरिक्त, ते दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष आणि तालुक्यातील बेलोरा गावचे माजी सरपंचही राहिले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/