
पुण्यातील १६ वर्षीय स्क्वॉशपटू अनिका दुबे हिची कॅनडामध्ये होणाऱ्या वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. २० ते ३१ जुलैदरम्यान नायगरा-ऑन-द-लेक येथे होणाऱ्या या स्पर्धेत अनिका भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अलीकडेच चीनमध्ये झालेल्या ३३व्या आशियाई ज्युनियर वैयक्तिक स्पर्धेत तिने मुलींच्या १७ वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकावले होते. अनिका ही तीन वेळा राष्ट्रीय विजेती असून तिचा स्क्वॉश प्रवास पुण्यातील सार्वजनिक कोर्टावरून सुरू झाला. तिच्या यशामागे चान्स2स्पोर्ट्स (सी 2एस) या संस्थेचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. ही संस्था शालेय स्तरावर प्रतिभावान खेळाडू शोधून त्यांना प्रशिक्षक, स्पर्धांचा अनुभव, उपकरणे आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देते. संस्थेचे सहसंस्थापक आणि माजी आंतरराष्ट्रीय स्क्वॉशपटू अभिनव सिन्हा यांनी सांगितले की, भारतात प्रतिभेची कमतरता नाही, मात्र संधीची आहे. योग्य प्रशिक्षण आणि सक्षम व्यवस्थापनाच्या बळावर सामान्य कुटुंबातील खेळाडूंनाही जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे काम संस्था करत आहे. सध्या सी2एस संस्थेने ४५० हून अधिक खेळाडूंना घडविले असून २० पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार केले आहेत. पुढील पाच वर्षांत अधिक खेळ आणि प्रशिक्षण केंद्रे उभारण्यासाठी संस्था २५ कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या प्रयत्नात आहे. अनिकाच्या यशामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून आगामी लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्येही तिच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/