
नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलीय. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले असून रामकुंड परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. गोदाघाटावरील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली असून, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. याच दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने रात्रभर गांधी ज्योत परिसरातील मंदिरात अडकलेल्या एका नेपाळी पर्यटकाची सकाळी स्थानिक प्रशासन आणि जीव रक्षक दलाने सुखरूप सुटका केली आहे. गोदावरीला पूर, रामकुंडावरील मंदिरे पाण्याखाली नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाली आहे. रामकुंड परिसरात आता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, परिसरातील ऐतिहासिक आणि छोटी मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्याचा स्तर इतका वाढला आहे की, गोदाघाटावर असलेल्या प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता, प्रशासनाने गोदाघाटावरील सर्व दुकाने आणि टपऱ्या सुरक्षित स्थळी हलवण्याच्या कडक सूचना व्यावसायिकांना दिल्या आहेत. नेपाळी पर्यटकाचे थरारक रेस्क्यू रामकुंड परिसरात पुराचे पाणी अचानक वाढल्याने गांधी ज्योतजवळील एका मंदिरात एक पर्यटक अडकून पडला. पाण्याचा वेग आणि पातळी वाढल्याने त्याला बाहेर येता आले नाही व संपूर्ण रात्र त्याला जीव मुठीत धरून पाण्यातच काढावी लागली. सकाळी या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अग्निशमन दल, पोलीस आणि जीवरक्षक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बचाव मोहीम राबवत या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले. हा तरुण मूळचा नेपाळचा असून, तो गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू; सतर्कतेचा इशारा नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विविध धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या प्रमुख धरणांव्यतिरिक्त पुनेगाव, भावली आणि कडवा धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या या पाण्यामुळे गोदावरी आणि दारणा नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि पुराच्या पाण्यात उतरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हेही वाचा.. राज्यात पावसाचा धुमाकूळ: पालघरमध्ये शाळांना सुट्टी, पुण्यात ‘रेड अलर्ट’; मराठवाडा-विदर्भात दिलासा, शनिवारनंतर उघडीप? संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून, सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’, तर नाशिक, पालघरसह कोकणातील जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पुराच्या पाण्यामुळे १५ ते १६ गावांचा मुख्य संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसामुळे तानसासह तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/