
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ खासदारांनी पक्षाचा ‘व्हिप’ झुगारून स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा सध्या राजकारणात चांगलीच तापली आहे. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी अत्यंत संतप्त शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी तुम्हाला खासदार केलं नसतं, तर तुम्हाला कोणी विचारलं असतं का?” असा थेट सवाल करत सरदेसाई यांनी बंडखोर खासदारांवर आणि भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. वांद्रे पूर्व येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक भूमिका मांडली. “स्वतःला आरशात बघताना लाज वाटली पाहिजे” सरदेसाई म्हणाले की, गेले तीन दिवस आपण खासदार फुटीच्या ज्या चर्चा ऐकत आहोत, त्या अत्यंत घृणास्पद आणि दुर्दैवी आहेत. “या खासदारांना स्वतःला आरशात बघताना लाज वाटली पाहिजे. यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भर उन्हात फिरले. एका विधानसभा क्षेत्रात १०-१० सभा घेतल्या. त्यामुळे या लोकांची निवडून येण्याची ताकद केवळ पक्षावरील निष्ठा आणि मातोश्रीवरील प्रेमामुळे होती. हे लोक इतके गोड बोलायचे की उद्धव साहेब त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. पण ते असा विश्वासघात करतील याची कुणालाच कल्पना नव्हती,” अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. हा तर दरोडा आहे, मर्दानगी नाही माध्यमांना उद्देशून सरदेसाई म्हणाले की, या ‘ऑपरेशन टायगर’ सारख्या गोष्टींना तुम्ही ‘नॉर्मलाईज’ करू नका. “एखाद्याच्या घरात दरोडा पडला तर दरोडेखोरांना पकडण्याऐवजी घरमालकाने कुलूप कसे लावले नाही, यावरच चर्चा होते. हा निव्वळ लोकशाहीवरील दरोडा आहे.” भाजपवर टीका करताना ते म्हणाले, “तुमच्याकडे देशात आणि राज्यात मेजॉरिटी आहे. मोदींची सत्ता आहे, पण तरीही तुमचं पोट भरत नाही. केवळ एखादं बिल पारित करून घ्यायचं म्हणून लोकशाहीला तडे देण्याचं हे राजकारण जनता मान्य करणार नाही. सत्ताधाऱ्यांना ‘भस्म्या’ (हव्यास) नावाचा रोग जडला असून त्यावर त्यांनी उपचार करून घ्यावेत.” काँग्रेस विलीनीकरणाच्या आरोपांवर पलटवार शिवसेना ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, या भीतीने आम्ही पक्ष सोडला, असा दावा काही बंडखोर करत आहेत (जसे की नितेश राणेंनी म्हटले आहे). यावर सरदेसाई यांनी कडक उत्तर दिले. ते म्हणाले, “हे अत्यंत हास्यास्पद आहे. ज्यांनी हा आरोप केलाय ते स्वतः काँग्रेसच्याच मुशीत तयार झाले आहेत. नितेश राणे स्वतः अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते. नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख हे सर्वजण कधीकाळी काँग्रेसमध्येच होते. आणि आता यांना अचानक काँग्रेसची अलर्जी कशी झाली?” अजूनही परतीचे दरवाजे खुले आहेत वरुण सरदेसाई यांनी या सर्व घडामोडींवर सावध पवित्रा घेताना स्पष्ट केले की, त्यांनी अद्याप लोकसभा अध्यक्षांना दिलेले पत्र किंवा त्यांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो पाहिलेले नाहीत. “मी कुणाचेही नाव घेणार नाही. कारण मला आजही अपेक्षा आहे की त्यांच्या मनाचे परिवर्तन होऊ शकते. ‘सुबह का भुला अगर शाम को घर आ जाये, तो उसे भुला नही कहते.’ जर त्यांनी आपली चूक सुधारून पुन्हा पक्षात येण्याचा निर्णय घेतला, तर उद्धव ठाकरे साहेब त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील,” असे सांगत त्यांनी बंडखोरांना माघारी फिरण्याचे आवाहनही केले. वरुण सरदेसाई यांच्या या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते की, ठाकरे गट या फुटीच्या घटनेमुळे कमालीचा संतप्त असला, तरी आजही ते काही खासदारांच्या ‘घरवापसी’ची अपेक्षा ठेवून आहेत. तसेच, या फुटीमागे केवळ भाजपचा ‘दोन तृतीयांश’ बहुमताचा हव्यास कारणीभूत असल्याचे त्यांनी थेट अधोरेखित केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
